कुकडीचे हक्काचे पाणी न मिळाल्यास हक्कभंग प्रस्ताव आणणार
Featured

कुकडीचे हक्काचे पाणी न मिळाल्यास हक्कभंग प्रस्ताव आणणार

Sarvmat Digital

लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तीव्र आंदोलन करणार- आ. बबनराव पाचपुते

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी हक्काचे सव्वा-दीड टीएमसी पाणी मिळायला पाहिजे होते; पण आतापर्यंत साडेसातशे ते आठशे एमसीएफटी पाणी मिळाले आहे. अधिकार्‍यांच्या चुकीच्या नियोजनामुळे श्रीगोंद्यातील शेतकर्‍यांच्या हक्कावर गदा येत असेल व श्रीगोंदेकरांना कुकडीचे हक्काचे पाणी मिळत नसेल तर आपण विधानसभेत जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांवर हक्कभंग प्रस्ताव आणू. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर जर हक्काचे पाणी मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा आ. बबनराव पाचपुते यांनी दिला. अजूनही वेळ गेली नसल्याने अधिकार्‍यांनी श्रीगोंद्याला पाणी मिळवून द्यावे. लॉकडाऊनमुळे आलेल्या मर्यादांचा कुणीही गैरफायदा घेऊ नये, असा सल्लाही आ. पाचपुते यांनी दिला आहे.

श्रीगोंद्यातील राजकारण पुन्हा एकदा पाण्यावरून पेटण्याची शक्यता आहे. आ. पाचपुते यांनी अधिकार्‍यांच्या माध्यमातून सत्ताधार्‍यांवर नेम धरला आहे. ते म्हणाले, श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. चालू आवर्तनातून श्रीगोंद्याला साडेसातशे ते आठशे एमसीएफटी पाणी मिळाले आहे. आणखी 500 एमसीएफटी पाणी मिळायलाच पाहिजे.

कालवा-सल्लागार समितीची बैठक करोनाच्या पार्श्वभूमीवर झाली नाही, पण अधिकार्‍यांनी ठरविले असते तर व्हिडिओ कॉन्फरन्सवर घेता आली असती. श्रीगोंद्याला हक्काचे पाणी देण्याबाबत कुकडीच्या अधिकार्‍यांनी आपल्याला शब्द दिला होता. पाणी कमी येतेय असे लक्षात आल्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यांनी संबंधित अधिकर्‍यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र संबंधित अधिकार्‍यांनी योग्य तो पाठपुरावा केल्याचे दिसून येत नसल्यामुळे श्रीगोंदा वंचित राहत आहे.

लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचे आम्ही पालन करीत आहोत. श्रीगोंदेकरांना हक्काचे पाणी मिळाले नाही तर लॉकडाऊन संपल्यानंतर श्रीगोंद्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करणार आहोत. ज्या अधिकार्‍यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकर्‍यांच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता आहे, ते जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांवर विधानसभेत हक्कभंग आणणार आहे.

कुकडी व घोड कार्यक्षेत्रात एकमेव विरोधी पक्षाचा मी एकटाच आमदार असल्याने याचा सत्ताधारी दुरुपयोग करत असावेत, असे मला वाटत असल्याची खंतही आ. पाचपुते यांनी व्यक्त केली. मी सध्याच्या विधानसभेत सर्वात जेष्ठ आमदार असून उद्या वेळ आली तर या पाणी प्रश्नाबाबत विधानसभेतही याबाबत आवाज उठविणार आहे. तसेच आमदार कोणत्या पक्षाचा हे न पाहता शेतकरी केंद्रबिंदू मानून पाणी दिले पाहिजे.

उद्या पारनेरकरांनाही पाणी मिळेल, पण त्यात आमचे श्रीगोंदेकराचे काय, असा सवालही पाचपुते यांनी उपस्थित केला. लॉकडाऊन नसते तर श्रीगोंदेकरांवर ही वेळ आली नसती असेही पाचपुते म्हणाले. कर्जत-जामखेड-करमाळ्याला आवर्तन जाताना मुबलक प्रमाणात पाणी जाते. पण श्रीगोंद्याचे आवर्तन सुरू झाल्यावरच आवर्तनात अडचणीत येते. दरवेळी श्रीगोंद्यातील शेती जाळण्याचे पाप अधिकारी करतात. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असेही पाचपुते यांनी ठासून म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com