श्रीरामपूर टेलला पाणी मिळवून देण्यासाठी आमदारकी पणाला लावेन – आ. कानडे
Featured

श्रीरामपूर टेलला पाणी मिळवून देण्यासाठी आमदारकी पणाला लावेन – आ. कानडे

Sarvmat Digital

नाऊर (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर, निमगांव खैरी, जाफराबाद, नायगाव, चितळी, गोंडेगाव, रामपूर, माळेवाडी आदी परिसरातील शेतकर्‍यांसाठी वरदायी असलेल्या चारी क्र.20 व 19 सह पोटचारीची त्वरित दुरुस्ती करून, अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित असलेल्या या परिसराला पाणी मिळवून देण्यासाठी आमदारकी पणाला लावू असे प्रतिपादन आ. लहु कानडे यांनी केले.

चारी क्र.20 व 19 च्या पहाणीप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सतीश बोर्डे, भारत बढे, दिलीप तांबे यांच्यासह नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, वरिष्ठ अभियंता श्री. निर्मळ, उप-अभियंता महेश गायकवाड, श्री. कुर्‍हे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

आ. कानडे यांनी अधिकांर्‍याना या चारीच्या कामासंदर्भात कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. या परिसरातील चार्‍या नामशेष होण्याच्या मार्गावर असून गेल्या पंधरा वर्षांपासून येथील पाणी हायजॅक झाले आहे. पूर्वीचे वैभव परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूच, त्यासाठी आम्ही शेतकर्‍यांशी संवाद करून भविष्यात पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मात्र, त्यासाठी आमच्या चार्‍यांना पाणी देण्याची व्यवस्था करण्याचे स्पष्ट आदेश आ. लहु कानडे यांनी दिले.

मी स्वत: हा भाग टेलला असून पाणी मिळत नसल्याची तक्रार केली होती. यावेळी कालवा समितीच्या बैठकीचे अध्यक्ष ना. छगन भुजबळ यांनी देखील टेल टू हेड पाणी देण्यासाठी हिरवा कंदील दिला असून, आपण या भागातील टेलपासून पाणी देणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी घेण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून यासाठी शेतकर्‍यांकडून मागणी अपेक्षित आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकर्‍यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आ. कानडे यांनी केले.

याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती नितीन भागडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास बोर्डे, जाफराबादचे सरपंच संदीप शेलार, अ‍ॅड. दिनेश पुंड, गोविंदराव वाघ, सुनील लांडे, भाऊसाहेब मोकळ, सुनील दुशिंग, रमेश जेजूरकर, सुनील दिवटे, राजेंद्र तांबे, बाबासाहेब मेहेत्रे, अनिल नांगळ, रेवनाथ झुराळे, भागवत काळे, विजय परदेशी, रवींद्र करपे, रावसाहेब पोखरे, दिलीप तांबे, सतीश बडधे, कुंडलिक दिवटे, आप्पासाहेब थोरात, महेश बोरसे, साईनाथ पोखरे, प्रताप शिंदे, भानुदास भवार, चांगदेव नांगळ, कचरू कणसे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शेतकर्‍यांनी नामको हा 110 कि.मी. कालवा असून वरील सेक्शनला मागणी पेक्षा जास्त पाणी मिळते, मात्र आमच्या 19 व 20 चारी भागाला आरक्षित व हक्काच्या पाण्यापेक्षा पाणी कमी मिळत आहे. वरच्या भागात अवैध पध्दतीने कॅनॉलमध्ये पाईपद्वारे बेसुमार पाण्याचा उपसा होत आहे. याकडे अधिकारी डोळेझाक करत असल्याने टेलच्या भागातील शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी उपस्थित शेतकर्‍यांनी केल्या.

Deshdoot
www.deshdoot.com