आमदार कानडे यांच्याबाबत वर्पे, भिसेंची नाराजी

jalgaon-digital
3 Min Read

चुकीच्या राजकीय निर्णयामुळे श्रीरामपूरकर हवालदिल – वर्पे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- करोनाच्या संकटकाळात गोरगरिबांचे हाल होत असताना श्रीरामपूर मतदारसंघाचे नेतृत्व आधार देण्याऐवजी लोकांकडून सामान गोळा करून स्वतःचे स्टिकर लावण्यात व्यस्त आहे. या मतदारसंघात झालेल्या चुकीच्या राजकीय निर्णयामुळे नागरिकांना हवालदिल होण्याची वेळ आल्याचा आरोप भाजयुमोचे सरचिटणीस अक्षय वर्पे यांनी केला आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. वर्पे म्हणाले, वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे दोन वेळच्या जेवणाचे हाल सुरू झाले आहेत. अशावेळी भाजप पदाधिकारी, बोटावर मोजण्याइतके नगरसेवक, सामाजिक संस्था, संघटना नागरिकांसाठी झटत आहेत. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा नागरिकांना धान्य मिळत नसल्याने त्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळावा, वैद्यकीय सुविधा उभ्या करता याव्यात, जनजागृतीसह आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रत्येक मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीला 50 लाख रुपये राज्य शासनाने दिले आहे.

त्याचा वापर वेळ निघून गेल्यावर करण्यात येणार आहे का ? गेल्या महिनाभरात मतदार संघात झालेल्या फसव्या घोषणा देखील पूर्ण झालेल्या नाहीत. भुकेने नागरिक चिंतेत असताना 9 लाखांच्या डेटॉल साबण लोकांनी खायच्या का? त्याऐवजी रेशनकार्ड नसलेल्या लोकांना 9 लाखांचे धान्य का वाटले गेले नाही ? संपूर्ण मतदार संघात सॅनिटायझर, मास्क का दिले गेले नाही? असा सवालही श्री. वर्पे यांनी उपस्थित केला आहे.

आमदारांचे घर व संपर्क कार्यालय बंद – भिसे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कोणीही उपाशी राहणार नाही, अशी गर्जना करणार्‍या आमदार लहू कानडे यांचा दावा खोटा ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदारांचे श्रीरामपूर संपर्क कार्यालय व निवासस्थान बंद असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भैया भिसे यांनी केला आहे.

भिसे म्हणाले की, करोनाच्या संकटाने गोरगरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत आमदार लहू कानडे यांनी दानशूर संस्था, संघटना, लोकांच्या माध्यमातून किराणा किटचे सामान गोळा करत गुजराथी मंगल कार्यालय येथून गरिबांना वाटप करण्याचे जाहीर केले. हे वाटप करताना ग्रामीण भागाचा विचार केला गेला नाही. शहरातील हजारो गरिब कुटुंबांना मदत मिळाली नाही.

ज्यांना मदतीची अपेक्षा आहे असे अनेक गरीब लोक आमदारांच्या घरी, कार्यालयासह गुजराथी मंगल कार्यालयात पायपीट करत जात आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी कुलूप असल्याने गरिबांची निराशा होत असल्याची खंत असल्याचे भिसे यांनी व्यक्त केली आहे.

आमदार लहू कानडे हे ऐन संकटात श्रीरामपूर मतदार संघातील नागरिकांना वार्‍यावर सोडून निघून गेल्याने गोरगरीब हवालदिल झाले आहेत. आ. कानडे यांच्यासाठी निवडणुकीत जीवाचे रान करणार्‍या कार्यकर्त्यांनी जनतेसाठी त्यांच्या विरोधात भूमिका घेण्याची वेळ आल्याचेही श्री. भिसे यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *