आवर्तनात सर्व शेतकर्‍यांचे भरणे करण्याचे आदेश : आ. कानडे
Featured

आवर्तनात सर्व शेतकर्‍यांचे भरणे करण्याचे आदेश : आ. कानडे

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- रब्बी हंगामाकरिता भंडारदरा धरणातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुटले असून या आवर्तनातून सर्व शेतकर्‍यांचे भरणे करून देण्याचे आदेश अधिकार्‍यांना देण्यात आले अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याप्रमाणे रब्बी हंगामाकरिता भंडारदरा धरणातून आवर्तन सुटले आहे.

सदरचे आवर्तन हे तीस दिवस चालणार असून यामध्ये शेतीबरोबरच पिण्याच्या पाणी योजनांना पाणी दिले जाणार आहे. 1500 क्युसेसने सध्या निळवंडे धरणातून पाण्याचा प्रवाह होत असून गरज पडल्यास 1700 क्युसेसपर्यंत विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे निश्‍चितच मतदार संघातील रब्बी हंगामातील पिकांचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.

या आवर्तनातून जवळपास साडेतीन दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याकरिता कालवा सल्लागार समितीने तत्वतः मान्यता दिली आहे. मतदार संघातील सर्वच शेतकर्‍यांचे शेवटपर्यंत भरणे करून देण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी देखील याबाबत काही अडचणी असल्यास शेतकर्‍यांनी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार लहू कानडे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com