Friday, April 26, 2024
Homeनगरआ.कानडे व माजी आ. मुरकुटे यांची जवळीक !

आ.कानडे व माजी आ. मुरकुटे यांची जवळीक !

– अशोक गाडेकर

ससाणे गटात अस्वस्थता; श्रीरामपुरातील राजकारण बदलण्याचे संकेत

- Advertisement -

श्रीरामपूर – विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवारास साथ देणारे माजी आमदार भानुदास मुरकुटे व काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्यात गेल्या महिनाभरापासून जवळीक वाढली आहे. त्यामुळे विधानसभेला कानडे यांच्या विजयासाठी जिवाचे रान करणार्‍या ससाणे गटात अस्वस्थता निर्माण झाली असून हे तालुक्यातील बदलत्या राजकारणाचे संकेत मानले जात आहेत.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तो अभैद्य ठेवण्यात माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांच्या गटाचा मोठा वाटा आहे. गेल्या 20 -25 वर्षापासून ससाणे गटाने आपली काँगसचा हा बुरुज राखला आहे. त्यामुळेच जयंत ससाणे व भाऊसाहेब कांबळे हे दोघेही दोन पंचवार्षिक या मतदारसंघाचे प्रतिनिधत्व करू शकले.

या पंचवार्षिक निवडणुकीतही सर्व बलाढ्य नेते एका बाजूला तर ससाणे गट दुसर्‍या बाजुला अशी राजकीय परीस्थिती असताना लहू कानडे यांना विजयी करून काँग्रेसचा झेंडा फडकविण्यात ससाणे गट यशस्वी झाला.

या मतदारसंघात ससाणे गटाने विजय मिळविला असला तरी निवडणूक निकालानंतर अवघ्या काही दिवसातच आ. कानडे यांनी वेगळी चूल मांडली. आ. कानडे हे प्रशासनात काम केलेले अनुभवी खिलाडी असल्याने त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा. मात्र त्यांचा हा निर्णय ससाणे गटाला रुचला नाही.

ज्यांच्या पाठबळामुळे आपण या तालुक्याचे आमदार झालो त्या संघटनेच्या विरोधात भूमिका घेताना आ. कानडे यांनी विचार करायला हवा होता, अशी माफक अपेक्षा या गटाची होती. आ. कानडे व ससाणे गट यांची मने दुभंगली. आता यात चूक कुणाची ? अन बरोबर कोण ? याचा विचार आ. कानडे व ससाणे गटाने आत्मपरीक्षण करून करायला हवा.

करोना विणाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमी लागू केलेल्या लॉगडाऊनच्या काळात मदत वाटण्यात आ. कानडे व ससाणे गटाची यंत्रणा स्वतंत्र दिसली. त्याचवेळी श्रीरामपूर विधानसभा मतदासंघातील जाणकारांना काहीतरी खटकल्याची जाणीव झाली. दरम्यान अशोक सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या सॅनिटायझरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास आ. लहू कानडे यांनी कारखाना कार्यस्थळी जावून हजेरी लावली त्याचवेळी अनेकांच्या भुवया उंचाल्या होत्या.

मात्र आता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांच्या नावाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. लहू कानडे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यात पाटपाणी नियोजन, गरिबांना मदत तसेच बाजार समितीत कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा असे अनेक संदर्भ दिले आहेत. या पत्रकामुळे आ. कानडे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची जवळीकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात हे बदलत्या राजकारणाचे संकेत मानले जात आहेत.

आ. विखे यांचे भाकीत खरे ठरणार !
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याजे माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात श्रीरामपुरातील राजकारण भल्याभल्यांना समजत नाही. येथे ‘कोणत्या गायीचा गोर्‍हा…..?’ अशा मार्मीक शब्दात येथील राजकाराणाविषयी टिप्पणी केली होती. ती खरी ठरते की काय? अशी चर्चा आता श्रीरामपुरात सुरु झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या