कर्मचार्‍यांच्या थकित देयकांसाठी आ. जगताप महापालिकेत
Featured

कर्मचार्‍यांच्या थकित देयकांसाठी आ. जगताप महापालिकेत

Sarvmat Digital

उपायुक्त पठारे यांच्याशी चर्चा । लवकरच बैठक घेण्यात येणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या विविध कर्मचार्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात आ. संग्राम जगताप यांनी आज उपायुक्त प्रदीप पठारे यांच्याशी चर्चा केली. कर्मचार्‍यांची आर्थिक देयके मोठ्या प्रमाणात थकित असल्याने त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महापालिका कर्मचार्‍यांची पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा फरक, कालबद्ध पदोन्नत्या, पदोन्नत्या झालेल्यांचा फरक, दिवाळीत जाहीर केलेला पण थकित असलेला सानुग्रह अनुदान, केडगाव ग्रामपंचायतीतील महापालिकेत समाविष्ट झालेल्या कर्मचार्‍यांचा 1999 ते 2004 या काळातील फरक आदी मागण्यांबाबत सातत्याने प्रशासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे. मात्र ही मागणी अद्याप पूर्ण न झाल्याने या कर्मचार्‍यांनी आ. संग्राम जगताप यांना निवेदन देऊन यात लक्ष घालण्याची मागणी केली होती.

त्यानुसार आ. जगताप यांनी महापालिकेस पत्र देऊन कर्मचार्‍यांच्या देणीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे सांगितले होते. महापालिकेने याबाबत त्यांना अद्याप काहीच कळविले नव्हते. या प्रश्नांसंदर्भात अगोदर युनियनशी चर्चा करून मगच आ. जगताप यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे महापालिकेचे नियोजन होते. मात्र युनियनची बैठकच झाली नसल्याने आ. जगताप यांच्या पत्राला उत्तर देण्यात आले नाही.

आ. जगताप आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी याबाबत आज महापालिकेत येऊन चर्चा केली. कर्मचार्‍यांनी दिलेली निवेदने, त्यांची थकित देयके याबाबत विचारणा केली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याबाबतही सूचना दिल्या. युनियनशी या संदर्भात अगोदर चर्चा करण्यात येईल, त्यानंतर आ. जगताप यांच्यासमवेत बैठक घेण्याचे यावेळी ठरले.

सारसनगरच्या ले आऊटचाही विषय ?
सारसनगर भागातील काही ले आऊटला नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक आणि भूखंड विकसकांमध्येही अस्वस्थता आहे. नोटिसा देऊन त्यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणी झाल्यावरच यावर काय तो निर्णय होणार असला, तरी नेमके प्रकरण काय आहे, नोटिसा कशासाठी दिल्या आहेत आदीबाबतची माहिती आ. जगताप यांनी महापालिकेत घेतल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com