सोनईत जल्लोष, मंदिरांमध्ये पूजा-अभिषेक
Featured

सोनईत जल्लोष, मंदिरांमध्ये पूजा-अभिषेक

Sarvmat Digital

सोनई (वार्ताहर)- सोनईचे रहिवाशी शंकरराव गडाख पाटील यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली अन् सोनईत तिसर्‍यांदा दिवाळी साजरी झाली.

24 ऑक्टोबरला नेवासा विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित झाला. पाणीदार शंकरराव आमदार झाले अन् सोनईत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला 29 ऑक्टोबरला दिवाळी सण होता त्यादिवशीही फटाक्यांची आतषबाजी आणि काल सोमवारी 30 डिसेंबरला पाणीदार आमदार नामदार झाले. त्यांना राज्यपालांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. या आनंदोत्सवाने सोनाईत अक्षरशः तिसरी दिवाळी साजरी झाली.

पहाटेपासूनच युवक व कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली. दिवसभरात चौकाचौकांत गुलालाची उधळण, वाद्यवृंदे व फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. मुख्य रस्ते, चौक, घरे व दुकानांसमोर फटाके व गुलालाचा मुक्त वापर केला गेला.

गावातील प्रमुख देव देवता व मंदिरांत कार्यकर्त्यांनी पूजा अभिषेक करून आनंद व्यक्त केला. सोनईचे हनुमान मंदिर, त्रिलिंग महादेव मंदिर, स्वामी समर्थ मंदिर इत्यादी ठिकाणी तरुण मंडळे, महिला भगिनींनी पूजा अभिषेक केले. दिवसभर आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता,
सोनईचे पुरातन कालीन हेमाडपंती महादेव मंदिरात त्रिलिंग महादेव पिंडीची पूजा व अभिषेक सोनईचे सरपंच दादासाहेब वैरागर, ग्रामपंचायत सदस्य नितीन दरंदले व युवक कार्यकर्ते मनोज वाघ यांनी महादेवाला विधिवत अभिषेक पूजन करून पेढे वाटप केले तसेच स्वामी समर्थ केंद्रात सेवेकरी महिलांनी आरती करून प्रसाद वाटप केले. शनिशिंगणापूर येथे काका दरंदले तर घावटे वस्ती चिमटा येथे बाबुराव घावटे यांनी पेढे प्रसाद वाटप करून आनंद व्यक्त केला.

सोमवार गडाखांना ‘लकी’
भगवान शंकर महादेवाचा सोमवार हा वार शंकरराव गडाखांना लकी ठरत असल्याचे जाणवत असून गडाखांनी विधानसभेसाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून सोमवारीच अर्ज भरला होता. निवडणूक निकालानंतर त्यांची विजयी मिरवणूक सोमवारी झाली आणि कॅबिनेट मंत्रिपदाची शपथही सोमवारीच झाली हा ही योगायोग म्हणावा लागेल.

नेवाशात गडाखांच्या कार्यकर्त्यांनी केले पेढे वाटप

नेवासा (शहर प्रतिनिधी)- आमदार शंकरराव गडाख यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी श्रीखोलेश्वर गणपती मंदिराजवळील जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.

शंकरराव गडाख यांनी निवडणुकीनंतर लगेचच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. नेवाशाला पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले आहे याचा आनंद जनतेबरोबर कार्यकर्त्यांना झाला.गडाख समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला. तर शहरात विविध भागांमध्ये गडाखांचा शपथविधी सुरू होताच फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.

सतीश पिंपळे, सुनील धायजे, विशाल सुरडे, ज्ञानेश्वर तोडमल, पंकज जेधे, अंबादास लष्करे, सुधीर बोरकर, सुलेमान मणियार, अमोल मारकळी, आयूब शेख, ईस्माईल जाहगीरदार, दीपक ईरले, बंटी वाघ, अदित्य जगताप आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सकाळपासून सोशल मीडियावर गडाखांची मंत्रिपदी निवड झाल्याच्या अभिनंदनाच्या पोस्ट फिरत होत्या. कार्यकर्तेही त्यामुळे रात्रीच शपथविधीसाठी मुंबईला रवाना झाले होते.

Deshdoot
www.deshdoot.com