Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीरामपूर : आमदारांच्या चालकाकडून आकारला दंड

श्रीरामपूर : आमदारांच्या चालकाकडून आकारला दंड

मास्क न लावता फिरल्या प्रकरणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये शहर पोलीस व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सूचनांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मास्क न लावता गाडी चालवणारे आमदार लहू कानडे यांच्या चालकाला सुद्धा दंड आकारून त्याच्याकडून पाचशे रुपयांची वसुली नगरपालिका कर्मचार्‍यांनी केली .

- Advertisement -

पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन संयुक्तपणे शहरांमध्ये जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. दररोज सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावर फिरणार्‍या मास्क न लावणार्‍या व रस्त्यावर थुंकणार्‍या गावकर्‍यांकडून दंड वसूल केला जात आहे. यासाठी नगरपालिकेने चार टीम तयार केल्या आहेत. सकाळच्या सत्रात सध्या हे काम सुरू असून दिवसभर हे काम करण्यात यावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

राज्यांमध्ये सर्वत्र करोनाचे थैमान सुरू असताना स्थानिक अधिकार्‍यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरांमध्ये कुठेही रुग्ण आढळणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये शितिलथा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने शहरांमध्ये येणार्‍या लोकांची नाकेबंदी करावी. नवीन लोकांना शहरात येऊ देऊ नये. सबळ कारण असल्याशिवाय कोणालाही जाण्या-येण्याची परवानगी देऊ नये. अशी मागणी शहरवासियांनी केली आहे .

शहरांमध्ये सध्या रमजान महिना सुरू असून वॉर्ड नंबर 2 मध्ये संध्याकाळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर दिसून येतात. काल सायंकाळी पोलिसांनी वॉर्ड नंबर दोन, मिल्लतनगर या भागामध्ये गस्त घालून बाहेर फिरणार्‍या लोकांना घरात जाण्याचे आवाहन केले. मात्र पोलीस पुढे गेल्यानंतर मागे लोक बाहेर येतात. त्यासाठी शहर पोलिसांनी वॉर्ड नंबर दोनमध्ये चौका-चौकांमध्ये पॉइंट तयार करून रमजान ईद होईपर्यंत तेथे लक्ष द्यावे तसेच लोकांनी बाहेर न येण्याची काळजी घ्यावी व आपले रक्षण आपणच करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या