Saturday, April 27, 2024
Homeनगरकरवाढीचा विषय सध्या नाही, पण प्रक्रिया सुरू

करवाढीचा विषय सध्या नाही, पण प्रक्रिया सुरू

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ः करोना रोखण्यात सरकारला यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनाच्या फैलावाबाबत महाराष्ट्र सरकारने विशेष काळजी घेतली आहे. सरकार कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाही, असे राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. करोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावली असली, तरी भविष्यात कोणतीही करवाढ करण्याचा विषय सध्या सरकारसमोर नाही. मात्र त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याचे ना. थोरात यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ना. थोरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह उपस्थित होते. ना. थोरात म्हणाले, महाराष्ट्र सरकारने चांगल्या उपाययोजना केल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखता आला. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून एक हजार 600 कोटी रुपये अगोदरच आले आहेत. त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यातूनच आम्ही हा खर्च करत आहोत. आपत्कालीन स्थितीत हा निधी वापरला जातो.

केंद्राकडे अनेक योजनांचा हिस्सा राज्याला येणे आहे. त्यामध्ये पाच हजार 400 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा आहे. वारंवार मागणी करूनही तो मिळाला नाही. लॉकडाऊनमुळे जसा राज्याला आर्थिक ताण आहे. तसाच केंद्रावर सुद्धा आर्थिक ताण असल्याचे ना. थोरात म्हणाले.

महसुली उत्पन्नाबाबत विचारले असता ना. थोरात म्हणाले, लॉकडाऊनचा निश्चितपणे उत्पन्न वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे खर्चात कपात करणे, अन्य काही बाबी यावर विचार केला जाईल. राज्याचे उत्पन्न वाढावे म्हणून अधिक कर लावण्याचा कोणताही विषय सध्या नाही. सध्याची करोनाची परिस्थिती पाहता त्यावर लगेच निर्णय घेणे अपेक्षित नाही. मात्र त्यासंदर्भात निर्णय प्रक्रिया सुरू असल्याचेही ना. थोरात म्हणाले.

तांबे यांची मागणी रास्त
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवकांना विविध शासकीय समित्या, महामंडळांमध्ये संधी देण्याची मागणी केली आहे. त्याकडे लक्ष वेधले असता, ना. थोरात म्हणाले, त्यांनी केलेल्या मागणीत गैर काहीच नाही. त्यांची मागणी रास्त आहे. महिला आघाडी, पक्षातील इतर आघाड्यासुद्धा अशा प्रकारच्या मागण्या करत असतात. त्याचा पाठपुरावा पक्षाकडून सुरू असतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या