‘दोन लाखांवरील’ कर्जमाफीसाठी कटिबद्ध- ना. पाटील
Featured

‘दोन लाखांवरील’ कर्जमाफीसाठी कटिबद्ध- ना. पाटील

Sarvmat Digital

21 फेब्रुवारीला कर्जमाफीची यादी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दोन लाखांच्या पुढील व नियमित कर्जफेड करणार्‍यांसंदर्भात निर्णय घेण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. कर्जमाफीबद्दल दोन बैठका झाल्या आहेत. लवकरच याबाबत सरकार निर्णय घेईल, अशी स्पष्टोक्ती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना केली.

भाजप सरकारच्या काळामध्ये सहकार क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. ती निश्चितपणे दूर केली जाईल. जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे या क्षेत्रात काम करत आहे. त्यांच्या मागे राज्य सरकार खंबीरपणे उभे राहील. मात्र या क्षेत्राचा उपयोग कोणी राजकीय चळवळीसाठी करू नये, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

शिर्डी येथे होणार्‍या कार्यक्रमानिमित्त ते शनिवारी नगर येथे आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, सबाजी गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सहकारमंत्री पाटील म्हणाले, शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय महाआघाडी सरकारने घेतलेला आहे. राज्यातील 30 लाख शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये कर्जाची 29 लाख 700 कोटी रुपयाची रक्कम ही शेतकर्‍यांना मिळणार आहे.

येत्या 21 फेब्रुवारीपर्यंत याद्या जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीचे 98 टक्के काम पूर्णत्वाला गेले असल्याचे त्यांनी सांगितले. 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केलेली आहे. कोणात्याही शेतकर्‍यांना कर्जमाफीबद्दल अडचण होऊ नये, याकरता त्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी व सुलभ केली आहे. आता त्याचा बँकांनाही त्रास होणार नाही.

सहकार क्षेत्रामध्ये अनेक संस्था अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळे नागरी बँका तसेच पतसंस्थांचा विषय यामध्ये आहे. ठेवीदारांचे सुद्धा पैसे अनेक संस्थामध्ये अडकलेले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता ठेवीदारांचे पैसे मिळविण्यासाठी ज्या ज्या संस्था आहेत. तेथे प्रशासक नेमून त्याची कर्जवसुली तत्काळ कशा वसूल करता येईल हे पहिले जाणार आहे. त्यातून संस्था टिकेल व ठेवीदारांचे पैसे मिळेल यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासंदर्भातील लवकरच पावले उचलली जाणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘नियमित’साठी समितीच्या दोन बैठका

दोन लाखाच्या पुढे तसेच नियमित कर्जफेड करणार्‍या संदर्भामध्ये लवकरच निर्णय होईल. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. एकनाथ शिंदे, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व स्वतः मी अशी समिती गठित आहे. या समितीच्या दोन बैठका झालेल्या आहेत. या बैठकीमध्ये नियमित कर्जफेड व दोन लाखांच्या पुढील विषय घेण्यात आलेले आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Deshdoot
www.deshdoot.com