पशुखाद्याला सोन्याचे मोल, मात्र दुधाला कवडीमोल किंमत
Featured

पशुखाद्याला सोन्याचे मोल, मात्र दुधाला कवडीमोल किंमत

Sarvmat Digital

दुधाचा तुटवडा असताना भाव कसे कोसळले? शेतकर्‍यांचा सवाल

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- 35 रुपये लिटरचे दूध 18 ते 20 रुपये लिटरवर आले आहे. तर 900 रुपयांचे वालीस 1100 रुपये झाले व 1000 रुपयाची सरकी पेंड पोते 1250 रुपयाला झाले आहे. मात्र, शहरात गायीच्या दुधाचा प्रचंड तुटवडा असताना व शहरी भागात दूध 70 ते 80 रुपये लिटरने विक्री होत असताना दुधाचे अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात दर कोसळलेच कसे? असा प्रश्न दूध उत्पादक शेतकर्‍यांना पडला असून ‘उध्दवा अजब तुझे सरकार’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शेतीला जोडधंदा व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून दूध व्यवसायाची ओळख आहे. आज ग्रामीण भागात प्रत्येक शेतकर्‍यांच्या दारात कमीतकमी दोन गायी आहेत. या गायीच्या दुधावर त्यांचा हातखर्च व बाजारहाट चालतो. यामुळे अनेक शेतकरी दूध व्यवसायात उतरले आहेत. करोना सुरू होण्याअगोदर म्हणजे दि.20 ते 22 मार्चपर्यंत दुधाचे दर 35 रुपये प्रतिलिटर होते. 22 मार्चला सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आणि पहिला फटका दूध व्यवसायाला बसला.

दुधाचे टँकर मुंबईला घेऊन जाण्यासाठी चालक धजत नसल्याने व दुधाचा खप कमी झाल्याच्या नावाखाली गोकुळसारख्या मोठ्या दूध संघाने दूध स्वीकारण्यास असमर्थता दाखविली. पर्यायी दोन दिवस परिसरातील दूध डेअर्‍या बंद ठेवण्यात आल्या. दहा लिटरपासून शंभर ते दोनशे लिटर दूध रोज असणार्‍या दूध उत्पादकांना याचा मोठा फटका बसला. अक्षरशः दूध ओतून द्यावे लागले.

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली व यामध्ये 25 रुपये लिटरने सरकारने शेतकर्‍यांचे दूध स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर दूध संकलन सुरू झाले. पण दूध संघांनी सरकारचा नियम धाब्यावर बसवून 25 रुपयेऐवजी 20 ते 22 रुपये लिटरप्रमाणे भाव काढला. यामुळे दूध उत्पादकांना प्रतिलिटर 13 ते 15 रुपयांचा फटका बसला. मात्र, दूध संघांनी दर कमी करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले. त्यामुळे अडचणीत आला तो दूध उत्पादक शेतकरी !

दुधाचे दर कमी झाले तरी पशुखाद्याचे दर कमी होण्याऐवजी वाढले आहेत. सरकी, वालीस व कांडीसह सर्व पशुखाद्यांचे दर गोणीमागे 100 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. तर दुसरीकडे मात्र, दुधाचे दर कोसळत आहेत. यामुळे इकडे आड तिकडे विहीर, अशी स्थिती दूध उत्पादकांची झाली आहे. करोनामुळे दुधाला उठाव नसल्याने दर पडले असल्याची सबब सांगितली जाते. परंतु दुसरीकडे वेगळेच चित्र पाहण्यास मिळत आहे.

मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये दुधाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून याठिकाणी दुधाचे दर 70 ते 80 रुपयांवर गेले आहेत. मग दूध उत्पादकांची ही दिशाभूल कशासाठी? दूध हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने दूध वाहतुकीला सुरूवातीपासूनच परवानगी देण्यात आली आहे. तरीही अशी स्थिती का? हा डाव ज्यांनी टाकला आहे, त्यांची शासनाने चौकशी करून दूध उत्पादकांना पूर्वीप्रमाणे दर द्यावेत, अशी मागणी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे. दरवाढ न झाल्यास आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाने नुकताच चार लाख लिटर दुधाची भुकटी करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी देखील दुधाचे दर वाढण्याऐवजी कमीच आहेत. तर दुसरीकडे शेतकर्‍यांकडून कमी भावात दूध खरेदी करून शहरी भागात अव्वाचे सव्वा दराने विकून मधल्यामध्ये दुधाची मलई खाणारे कोण आहेत? याची शासनाने चौकशी करून दूध उत्पादकांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com