Wednesday, April 24, 2024
Homeनगरअहो बेकारी कसली, एमआयडीसीला कामगारांचा वानवा

अहो बेकारी कसली, एमआयडीसीला कामगारांचा वानवा

सुहास देशपांडे

अहमदनगर- करोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा फटका अनेकांच्या नोकरीला बसण्याची शक्यता असताना दुसरीकडे मात्र येथील एमआयडीसीमध्ये कामगारांची टंचाई भासण्याची भितीने उद्योजकांना ग्रासले आहे. परप्रांतीयांनी आपल्या गावी जाऊ लागल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. कंपन्या अचानक बंद कराव्या लागल्याने एमआयडीसीतील उद्योजकांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. 20 एप्रिलपासून काही कंपन्यांना कामकाज सुरू करण्याची परवानगी राज्यात मिळाली. मात्र नगरमध्ये परवानगीसाठी आवश्यक असलेल्या पोर्टलचा तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्याने कंपन्यांना परवानगी मिळण्यास चार दिवस उशीर झाला.

त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशात कामावर येणार्‍या कामगारांना कंपनीतच राहणे बंधनकारक केले. त्यामुळे अनेक कंपन्या संभ्रमावस्थेत राहिल्या. दोन दिवसांनी ती अट दूर केली, मात्र कामगारांसह उद्योजक, मोठ्या कंपन्यांचे अधिकारी यांनी बसमध्येच कंपनीत यायचे आणि त्याच बसमध्ये जायचे असे बंधनकारक केले. त्यावरही दोन दिवस चर्चाचर्वण झाल्यानंतर काही कंपन्या नावापुरत्या सुरू झाल्या. मेन्टेनन्सची कामे कंपन्यात होऊ लागली.

दोन दिवसांपूर्वी उद्योग खात्याचे सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योजक यांच्यात झालेल्या व्हीसीमध्ये अनेक मुद्दे चर्चेत आले. त्यात कंपनीपासून पाच किलोमिटरच्या अंतरात असलेल्या कामगारांना कंपनीत येण्यासाठी आणि परत घरी जाण्यासाठी ऑऩलाईन पास देण्याचे ठरले. मात्र दोन दिवस झाले, अद्याप यासाठी वेबसाईट तयार करण्यात आलेली नाही.

उद्योजक आणि कामगार याची प्रतिक्षा करत असतानाच केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांसाठी, तसेच जे परप्रांतीय आपापल्या गावाला जाण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत, त्यांना परतण्यासाठी परवानगी दिली. हा निर्णय येथील एमआयडीसीसाठी धोक्याचा ठरत आहे. येथील एमआयडीसीमध्ये किमान चार ते पाच हजार कामगार परप्रांतीय आहेत. ते कोणत्याही वेळेत उपलब्ध होऊ शकणारे आणि कितीही वेळ काम करणारे आहेत. सरकारच्या निर्णयामुळे या सर्वांनी आपल्या गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे.

चार दिवसांपूर्वी कंपन्या सुरू झाल्या, त्या बहुतांश या कामगारांच्या भरोशावर सुरू झाल्या होत्या. आता काम करत असलेल्या बहुतांश कामगारांमध्ये हेच कामगार आहेत. मात्र आता तेच परत निघाल्यामुळे कंपन्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे कामगार गेल्यानंतर परत येतील का, असाही प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कामगार काम करत असून, आता नव्याने घेणे, त्यांना पुन्हा काम शिकविणे अशा अनेक अडचणी कंपन्यांसमोर आहेत.

मतपरिवर्तनाचे प्रयत्न
परप्रांतीय कामगारांची एकूण काम करण्याची क्षमता, एवढ्या दिवसांचा अनुभव आणि लॉकडाऊननंतर नव्याने कंपन्या सुरू होणार असल्याने त्यांची असणारी गरज लक्षात घेता अनेक उद्योजकांनी परप्रांतीय कामगारांचे मतपरिवर्तन करण्याचे काम हाती घेतले आहे. आपल्या गावी जाऊन काय करणार, तेथे उदरनिर्वाहाचे साधन काय, अशी विचारणा करून त्यांनी येथेच थांबावे, असा प्रयत्न आहे. लॉकडाऊनमध्ये यापैकी अनेक कामगारांना किराणा व इतर वस्तू कंपनी मालकांकडून पुरविल्या होत्या. यापुढेही या सुविधा देण्याची तयारी काही उद्योजकांनी दर्शविल्याचे सांगण्यात येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या