Saturday, April 27, 2024
Homeनगरएमआयडीसीतील कंपन्यांकडून लॉकडाऊनचा गैरफायदा

एमआयडीसीतील कंपन्यांकडून लॉकडाऊनचा गैरफायदा

कामगार संघटना महासंघाचा आरोप : जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनचा गैरफायदा घेत एमआयडीसीमधील कामगारांना त्रास देणार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघ व क्रांतिसिंह कामगार संघटनेच्या मोजक्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला. सामाजिक अंतराचे पालन करत हा मोर्चा काढण्यात आला.
शहीद भगतसिंह उद्यान येथे भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, पायी मोर्चात कॉ. बहिरनाथ वाकळे, कॉ. महेबूब सय्यद, कॉ. रामदास वागस्कर सहभागी झाले होते. पत्रकार चौक ते डीएसपी चौक, कोठला स्टँड, स्टेट बँक चौकमार्गे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात आले. पोलिसांनी त्यांना गर्दी न करण्याच्या सूचना केल्या. कामगारांनी सोशल डिस्टन्सचे पालन केले. कामगारांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी मोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे, की एमआयडीसीमधे आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहोत. काही अपप्रवृत्तींकडून औद्योगिक व कामगार कायदे, शासन निर्णय, न्यायालयाचे आदेश पाळले जात नाहीत. नफेखोरीच्या नादात कामगारांचे हक्क डावलले जातात. न्यायालयाच्या आदेशांचा भंग केला जातो. कामगारांना कायम न करता वर्षांनुवर्षे कंत्राटी दाखविले जाते.

मुख्य उत्पादनाचे कायम कामही कंत्राटी कामगारांकडून केले जात आहे. करोनाच्या संकटकाळात शासनाने कामगारांना दिलासा देण्यासाठी व कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय काढून लॉकडाऊन काळात कोणत्याच कामगाराला कामावरून कमी करू नये, या काळातील वेतन द्यावे अशा सूचना केल्या आहेत. तरीही अहमदनगर एमआयडीसीमधील काही कारखानदार शासन निर्णयाला जुमानत नाहीत. सरकारी अधिकार्‍यांनाही जुमानत नसून, त्यांचे फोन घेत नाहीत.

लॉकडाऊनचा गैरफायदा घेत कामगारांना बेकायदेशीरपणे कामापासून दूर ठेवले आहे. कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. बँकेचे हप्ते, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह आदी प्रश्न गंभीर झाले आहेत. कारखानदार खोटी माहिती देऊन कामगारांना कामापासून दूर ठेवत आहे. जेथे कामगार संघटित आहेत, तेथे उत्पादन केले जात नाही. न्यायालयाचे अंतरीम आदेश असतानाही कायम कामगारांना प्राधान्य दिले जात नाही. काही कामगारांना ऑफिसमधे बोलावून बळजबरीने राजीनामे घेतले जात आहेत. राजीनामे न देणार्‍यांना निलंबित केले जात आहे.

एम. आय. डी. सी.तील कायम, कंत्राटी, निम व इतर अशा किमान दीड हजार कामगारांना बेरोजगार केले आहे. लॉकडाऊन काळातील सर्व राजीनामे रद्द करावेत आणि बेकायदेशीर निलंबन रद्द करण्याचे आदेश द्यावेत. सहायक कामगार आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या कंत्राटदारांकडील सर्व कामगारांना पूर्ववत काम नेमून देऊन लॉकडाऊन काळातील वेतन द्यावे, आदी मागण्या यावेळी कामगारांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या