एमआयडीसीतील उद्योजक ताटकळले; परवानगी काही मिळेना

एमआयडीसीतील उद्योजक ताटकळले; परवानगी काही मिळेना

अर्ज करूनही ऑनलाईन प्रतिसाद नाही : गोंधळाचे वातावरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका व नगरपालिका हद्दीबाहेरील एमआयडीसीतील कारखान्यांना कामकाज सुरू करण्याची परवानगी देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले, तरी दोन दिवसांपासून यासाठी परवानगी घेण्यासाठी आवश्यक असलेले पोर्टल प्रतिसाद देत नसल्याने उद्योजकांसह रोजंदारीच्या आशेवर असणार्‍या कामगारांचा हिरमोड झाला.

राज्यात काही ठिकाणी 20 एप्रिलनंतर व्यवहार सुरू करण्याचे सरकारने जाहीर केले होते. यामध्ये रोजंदारीवरील कामगारांचा प्रश्न मिटवा म्हणून एमआयडीसीतील कंपन्यांना मर्यादित स्वरूपात कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्याचा विषय पुढे आला. यावर गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयात खल सुरू होता. अखेर जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, विशेषतः मुंबई आणि पुणे वगळता इतर ठिकाणी मर्यादित स्वरूपात कंपन्यांना कामकाज करण्यास परवानगी देण्याचे ठरले. त्यातही महापालिका आणि नगरपालिका कार्यक्षेत्राच्या बाहेर असलेल्या कंपन्यांसाठी (ग्रामीण भाग) हा निर्णय घेण्यात आला.

कामकाज सुरू करू इच्छिणार्‍या कंपन्या, उद्योजकांनी तशी रितसर परवानगी राज्य सरकारकडून घेणे बंधनकारक होते. त्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले. तसेच कामकाज सुरू करण्यासाठी अनेक अटी होत्या. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात तीस टक्के कामगारांनाच कंपनीत येण्यास परवानगी राहील. येणारे कामगार, कर्मचारी स्वतःची वाहने न आणता पायी येतील. कंपनीत त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी. लॉकडाऊन संपून परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तो पर्यंत हे कामगार कंपनीतच राहतील.

तेथे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात यावे. काम करताना आणि कंपनीत राहताना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे आदी अटी होत्या. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाले, त्यावेळी अचानक कंपन्या बंद कराव्या लागल्या होत्या. तेंव्हापासून त्या बंदच असल्याने पहिल्या टप्प्यात मेंटेनन्सची कामे मोठ्या प्रमाणात आहेत. पहिल्या टप्प्यात काम करण्यास परवानगी मिळाल्यानंतर ही कामे करून घेण्याचा उद्योजक, कंपनी व्यवस्थापनाचा मानस होता.
रविवार सायंकाळपासून पोर्टलवर परवानगी मागण्यासाठी उद्योजक ताटकळून बसले आहेत.

मात्र सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत या पोर्टलवर प्रतिसाद मिळत नसल्याने कोणत्याही कंपनीस परवानगी मिळालेली नाही. हे केवळ नगरपुरतेच मर्यादित नाही, तर राज्यभरातच ही परिस्थिती असल्याचे समोर आले. उद्योजकांच्या विविध संघटनांनी आज सातत्याने सरकारकडे उद्योग खात्यात याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनाही ठोस असे काही सांगण्यात न आल्याने उद्योजकांमध्ये नाराजीची भावना आहे. उद्योजकांचे हे हाल होत असताना दुसरीकडे स्थानिक एमआयडीसी कार्यालयाकडे याबाबत कोणतीही माहिती नसल्याने दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न उद्योजकांपुढे आहे.

कंपनी सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, म्हणून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र यासाठीची वेबसाईट अपग्रेड करण्याचे कामकाज सुरू असावे. दिवसभर कोणालाही परवानगी मिळालेली नाही.
– अरविंद पारगावकर, सहसरव्यवस्थापक, लार्सन अँड टुब्रो

कंपनी चालू करायची की नाही, याबाबत स्पष्ट सांगणे गरजेचे आहे. दिवसभरात याबाबत कोणतेच स्पष्ट सूचना नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. सरकारने या गोष्टींचा गांभिर्याने विचार करायला हवा.
– अशोक सोनवणे, उद्योजकांच्या ‘आमी’ संघटनेचे माजी अध्यक्ष.

हे सर्व कामकाज राज्यस्तरावरून चालत असल्याने स्थानिक अधिकार्‍यांना याची काहीच माहिती नाही. त्यामुळे याबाबत आम्ही माहिती देऊ शकत नाहीत.
– गणेश वाघ, एमआयडीसी कार्यालयाचे प्रभारी, नगर.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com