नगर एमआयडीसीतील काही कंपन्या सुरू

नगर एमआयडीसीतील काही कंपन्या सुरू

सिमलेस, एल अँड टी, कमिन्ससह छोट्या कारखान्यांत काम सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- अखेर अनेक अडचणींचे डोंगर पार करत नगरमधील ‘एमआयडीसी’तील काही कारखान्यांची गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली फाटकं उघडली गेली आहेत. प्रत्यक्ष उत्पादन नसले, तरी मेंटेनन्स व पेंडिंग कामे केली जात आहेत. कामकाज सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये इंडियन सिमलेस, लार्सन अ‍ॅड टुब्रो, कमिन्स अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे बंधन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्राबाहेरील कंपन्या सुरू करण्यास काही अंशी परवानगी ‘एमआयडीसी’तील कंपन्यांना दिली होती. मात्र हे करताना स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावयाचे होते. जिल्हाधिकार्‍यांनी यासाठी कंपन्यांना परवानगी दिली, मात्र सुरूवातीला काढलेल्या आदेशात कंपनीतील कामगार एकदा कंपनीत आल्यानंतर त्यांची राहणे व इतर सर्व व्यवस्था कंपनीतच करण्याची अट टाकली होती. मात्र नंतर सुधारित आदेश काढून ही अट रद्द करून त्यांच्यासाठी बसेसची व्यवस्था करण्याचे सांगितले होते. तसेच खासगी वाहन एकही कंपनीत आणता येणार नसल्याचे सांगितले होते.

‘एमआयडीसी’तील उद्योजक, कंपन्यांचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. काही मोठ्या कंपन्या व छोट्या कंपन्यांनी एकत्रित बसेसची व्यवस्था केली आहे. यामध्ये कंपनीचे मालक, अधिकारी आणि कामगार असे एकत्रित येण्याचे ठरले. त्यानुसार छोट्या-मोठ्या कंपन्या सुरू करण्यात आल्या आहेत. काही कंपनीत 25, काही ठिकाणी 40 तर काही कंपन्यांमध्ये पन्नासपर्यंत कामगार येत आहेत.

छोट्या कंपन्यांनी तर ‘एमआयडीसी’च्या जवळ राहणारे व पायी कारखान्यात येऊ शकतील, अशा पाच-दहा कामगारांवरच काम सुरू केले आहे. यामध्ये प्राधान्याने मेंटेनन्स, मार्केटिंग विभागाचे कर्मचारी आहेत. प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यास आणखी बर्‍याच अडचणी आहेत. बहुतांश माल बाहेरून येणारा असल्याने तो पुरेशाप्रमाणात सुरू झाल्याशिवाय आणि त्या प्रमाणात नवीन ऑर्डर मिळाल्याशिवाय काम पूर्ण क्षमतेने सुरू होणे सध्या तरी शक्य नसल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले.

…तर कंपन्या बंद होतील
कंपनी सुरू केल्यानंतर विविध कारणांसाठी वेगवेगळ्या वस्तुंची गरज पडत असते. ती सध्या मिळणे अशक्य आहे. तसेच पुणे, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणांहून माल येत असतो. तो येण्यातही अनेक अडचणी आहेत. हे सर्व सुरळीत झाले तरच कंपनीची कामे पूर्ववत होतील. 3 मे नंतर हे सुरळीत न झाल्यास सध्या सुरू केलेल्या कंपन्या पुढे चालू ठेवणे अशक्य होणार असल्याने त्या बंद कराव्या लागतील, अशी भीती काही उद्योजकांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com