पाथर्डीत व्यापार्‍यांचा कडकडीत बंद
Featured

पाथर्डीत व्यापार्‍यांचा कडकडीत बंद

Sarvmat Digital

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – शहरातील व्यापार्‍यांवर समाजकंटकाकडून वारंवार विपरीत घटना घडतात, वाढती अतिक्रमणे बाजारपेठेच्या मुळावर येत असून राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळल्याने बाजारपेठ ठप्प झाली आहे. उठसूट नेहमीच बंदचे आवाहन केले जात असल्याने बाजारपेठ विस्कळीत झाली आहे. किरकोळ कारणावरून व्यापार्‍यांना त्रास देणे, वाढती गुन्हेगारी, छेडछाड रोखण्यात पोलिसांना अपयश येत असून लोकप्रतिनिधींचे व्यापार्‍यांच्या भावना व बाजार पेठेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला.गेल्या अनेक वर्षात प्रथमच पाथर्डी शहरातील बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद होती.

शहरातील किराणा, कापड, स्टेशनरी, मेडिकल, सराफ, नाभिक, खते बी-बियाणे, बिल्डिंग मटेरियल, भुसार व्यापारी, चर्मकार संघटना, छोटे व्यापारी संघटना, टपरीधारक, बाजारकरी, हॉटेल व्यावसायिक यासह विविध संघटना प्रथमच उस्फूर्तपणे बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या.
सर्व व्यापारी संघटना एकत्रित येऊन आंदोलनात उतरल्याने कोणत्याही राजकीय नेत्याला भाषणास परवानगी नव्हतं. व्यापारी मंडळींपैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच व्यापार्‍यांनी अत्यंत तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.

यावेळी केदारेश्वराचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, श्री तिलोक जैन मंडळाचे सचिव सतीश गुगळे, धरमचंद गुगळे, सोनू गुगळे, सराफ संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जिरेसाळ, नगरसेवक नंदकुमार शेळके, बंडू बोरुडे, रामनाथ बंग, रविशेठ पाथरकर, शंकर रासने, योगेश रसाने, संजय दराडे, शरद रोडी, प्रकाश गुंगे, अ‍ॅड.प्रतीक खेडकर, प्रशांत शेळके, कापड संघटनेचे भैय्या इजारे, मनसेचे संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, अशोक मंत्री, विशाल मंडलेचा, अनिल खाटेर, सचिन भंडारी, दिलीप गटागट यासह मोठ्या संख्येने सगळ्या व्यापारी संघटनांचे व्यापारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सतीश गुगळे म्हणाले की काही समाजकंटकापासून व्यापारी व बाजारपेठेला वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याने त्याचा विपरीत परिणाम व्यवहारावर झाला आहे. आपण काहीही केले तरीही आमचे कोणी काहीही करू शकत नाही असा काहींचा भ्रम झाला असून तो पोलीस प्रशासनाने दूर करण्याची गरज आहे. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्यामार्गाने आज आम्ही आंदोलन करत आहोत मात्र या पेक्षा उग्र आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नये अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

संतोष जिरेसाळ म्हणाले, सुपारी बहाद्दर, खंडणीखोर वृत्तीने शहरातील बाजारपेठ पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून पुढारी व लोकप्रतिनिधी बाजारपेठेच्या वाढीसाठी काय प्रयत्न करीत आहेत. दोन बंधारे किंवा चार दोन रस्त्याचे भूमिपूजने केले म्हणजे फार विकासकामे केली अशा भ्रमात पुढार्‍यांनी राहू नये. पालिकेच्या मूलभूत सुविधा नाहीत, रस्त्यावरील अडथळे बाजार पेठेतील खरे अडथळे ठरत आहेत असे जिरेसाळ म्हणाले. या सर्व विषयावर आमदार मोनिका राजळे यांनी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना गुंडांवर कारवाई करण्यास भाग पाडावे अशी मागणी यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली. मोर्चाला तहसीलदार नामदेव पाटील हे सामोरे गेले. यानंतर व्यापार्‍यांचे प्रतिनिधी व पाटील यांनी तहसीलदारांच्या दालनात चर्चा केल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

काही व्यापार्‍यांनी आमदार मोनिका राजळे यांचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर काहींनी पालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल नगराध्यक्ष डॉ. गर्जे यांच्यासमोरच तोंडसुख घेतले.

Deshdoot
www.deshdoot.com