मेडिकलमधून दुपारनंतर सौंदर्य प्रसाधने विक्रीला बंदी
Featured

मेडिकलमधून दुपारनंतर सौंदर्य प्रसाधने विक्रीला बंदी

Sarvmat Digital

जिल्हाधिकारी : पीठाच्या गिरणीचा पट्टाही रात्री थांबणार

अहमदनगर (प्रतिनिधी) –मेडिकल दुकानांतून औषध खरेदी करण्यासाठी आलेले लोक सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तू खरेदी करत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्यासाठी नियमावली तयार केली आहे. दुपारी तीन वाजेनंतर मेडिकलमधून सौंदर्य प्रसाधने विक्री करता येणार नाही, असा आदेश त्यांनी काढला आहे. याचसोबत पिठाची गिरणीही दुपारी तीन वाजेपर्यंतच सुरू राहील, असे या आदेशात म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. संचारबंदी असली तरी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोक बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. त्याचा तपास केला असता लोक मेडिकल दुकानांत औषध घेण्याच्या नावाखाली जातात, पण तेथून सौंदर्य प्रसाधने, टूथ पेस्ट व इतर वस्तू विकत घेतात. मेडिकल दुकाने औषध विक्रीसाठी नियमीत उघडी आहेत. परंतु तेथे औषधांऐवजी इतर वस्तूंची विक्री केली जात असल्याची बाब जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आली. त्यातून लॉकडाऊन तत्वाचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले.

त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी औषधे विक्रीसाठी काही निर्बंध घातले आहेत. नियमीत वेळेत मेडिकलमधून औषध विक्री करावी, दुपारी तीन वाजेनंतर मेडिकलमधून सौंदर्य प्रसाधने व इतर वस्तू विक्री करण्यास बंदी घालत असल्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहेत. याचसोबत अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, दुग्धजन्य पदार्थ व पिठाची गिरणी सुरू आहे. किराणा दुकान सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू आहेत. आता दुग्धजन्य पदार्थ व पीठाची गिरणीही याच काळात सुरू राहणार आहे. दुपारी तीन नंतर दुग्धजन्य पदार्थ व पिठाची गिरणी बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.

बहाणेबाजीला आळा
लॉकडाऊनच्या काळात नगरकर मेडिकल दुकानात औषध खरेदीच्या बहाण्याने जातात, पण तेथे औषध खरेदीच्या नावाखाली टूथपेस्ट, पावडरसारखी सौंदर्य प्रसाधने खरेदी करतात. लोकांना संचारबंदी असतानाही बाहेर पडण्यासाठी मेडिकल हा बहाणा झालाय. त्याला आळा घालण्याकरिता जिल्हा प्रशासनाने दुपारी तीन वाजेनंतर सौंदर्य प्रसाधने विक्रीवर बंदी घातली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com