महापौरांनी कर्मचार्‍यांना दिले शिस्तीचे धडे
Featured

महापौरांनी कर्मचार्‍यांना दिले शिस्तीचे धडे

Sarvmat Digital

काम करायचे नसल्यास सक्तीची निवृत्ती देण्याच्या सूचना

अहमदनगर (प्रतिनिधी) – कामावर वेळेवर या, बायोमेट्रिक पद्धतीनेच हजेरी नोंदवा, महापालिका परिसरात कोणी थुंकल्यास कायदेशीर कारवाई करा, अशा एक ना अनेक शिस्तीचे धडे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कर्मचार्‍यांना दिले.

आस्थापना विभाग व तेथील कर्मचारी तसेच काही विभागप्रमुखांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी हे शिस्तीचे धडे दिले. यावेळी उपायुक्त प्रदीप पठारे, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे, प्रसिध्दी अधिकारी दिगंबर कोंडा आदी उपस्थित होते. महापौर म्हणाले, कर्मचार्‍यांनी वेळेवर कामावर येणे आवश्यक आहे. महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात नागरिक नागरी सुविधेसंदर्भात कामासाठी आल्यास त्यास प्राधान्य देवून प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे.

तसेच शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरुवात महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधून करण्यात आलेली आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 करिता समिती नगर शहरामध्ये येणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेचा परिसर स्वच्छ राहणे आवश्यक आहे. परिसरामध्ये कोणी थुंकल्यास कायदेशीर दंडात्मक करण्याच्या सूचना वाकळे यांनी केल्या.

तसेच कर्मचार्‍यांनी ओळखपत्र लावणे आवश्यक दर्शनी भागात लावणे, कामावर आल्यानंतर व कामावरून जाताना बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविण्याच्या सूचना देतानाच उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांवर व काम न करणार्‍या कर्मचार्‍यांवर या पुढील काळात कारवाई केली जाणार असल्याची तंबी त्यांनी दिली.

आस्थापना खर्च कमी कसा करता येईल, या बाबत उपायुक्त पठारे व आस्थापना प्रमुख लहारे यांच्याशी यावेळी महापौर वाकळे यांनी चर्चा केली. काम न करणार्‍यांवर त्यांची बिनपगारी व वेतनवाढी रोखण्याबाबतची कारवाई करण्याचे आदेश दिले. कामात सुधारणा न झाल्यास व काम न करणार्‍या कर्मचार्‍यांना सक्तीने निवृत्त करण्याच्या सूचनाही महापौर वाकळे यांनी दिल्या.

Deshdoot
www.deshdoot.com