नेवासा तालुक्यात मावा विक्रेत्यांचा सुळसुळाट
Featured

नेवासा तालुक्यात मावा विक्रेत्यांचा सुळसुळाट

Sarvmat Digital

मटका व्यवसायही तेजीत

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- पोलीस तसेच अन्न व औषधे विभागाच्या दुर्लक्षामुळे भेंड्यासह नेवासा तालुक्यात मटका व मावा विक्री व्यवसायिकांचा सुळसुळाट झाला आहे.

तालुक्यातील नेवासा, सोनई व शिंगणापूर या तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख बाजारपेठांच्या गावांमध्ये मटका गुत्ते व मावा विक्री ठेले चालविले जात आहेत. मटका व्यवसायिकांनी तालुक्यात आपल्या व्यवसायाची पाळेमुळे घट्ट केली आहेत. अनेक गावांत चौकात व बाजरपेठेत मटका व मावा व्यवसाय चालविले जात आहेत.

माव्याचे नमुने तपासण्याची गरज..
तालुक्यात मावा विक्री ठेलेही जोरात सुरू आहेत. शेवगाव मावा, पाथर्डी मावा, नगरवाला मावा अशा वेगवेगळ्या नावांचे मोठमोठे फलक लावून भर रस्त्यावर मावा तयार करून विकला जात आहे. रोज हजारो रुपयांची उलाढाल होत असलेल्या या माव्यासाठी निकृष्ट दर्जाची सुपारी, चुना व 120/300 तंबाखू वापरली जाते. अन्न व औषधे विभागाने दुर्लक्ष केल्याने या कच्च्या मालाची गुणवत्ता कोण तपासणार? असा प्रश्न आहे.

अनेक कुटुंंबे उद्ध्वस्त…
मटका खेळणे व मावा खाण्याच्या व्यसनापायी अनेक कुटुंब आर्थिक व आरोग्याच्यादृष्टीने उद्ध्वस्त झाले आहेत आणि काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

भेंड्यात खुलेआम रस्त्यावरच मटका-मावा दुकाने…
तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे आणि बाजार पेठेचे गाव असलेले भेंडा बुद्रुक गावात पेट्रोल पंपापासून तर बसस्थानक चौक व कारखाना गेटपर्यंत नेवासा-शेवगाव रस्त्यावरच अनेक मटका बुकींचे गुत्ते व मावा विक्रीचे ठेले आहेत. भर बाजारपेठेतच ही दुकाने चालविली जात असतानाही पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com