मास्टर ब्लास्टर सचिन तेंङुलकरने घेतले कुटुंबासह साई समाधी दर्शन
Featured

मास्टर ब्लास्टर सचिन तेंङुलकरने घेतले कुटुंबासह साई समाधी दर्शन

Sarvmat Digital

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – क्रिकेट जगतात डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा तसेच क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणार्‍या माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी परिवारासह साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकर यांनी आपल्या परिवारासह सोमवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास साईदरबारी हजेरी लावत साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी त्याच्या समवेत भाऊ अजित तेंडुलकर, पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगा अर्जुन तेंडुलकर उपस्थित होते. दरम्यान सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली.

याप्रसंगी त्यांचा साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी साईबाबांची मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनीही त्यांचा सत्कार केला. उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी साईप्रतिमा भेट दिली. यावेळी साईबाबा संस्थानचे लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, नगरसेवक सुजित गोंदकर सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, सुनील गोंदकर, वैभव डांगे, मंदिर सुरक्षेचे मधुकर गंगावणे आदी मान्यवरांसह असंख्य चाहते उपस्थित होते. दरम्यान सचिन तेंडुलकर साई मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याची खबर मिळताच चाहत्यांनी तसेच साईभक्तांनी बघण्यासाठी पिंपळवाडी रोडलगत असलेल्या साईमंदिर गेट नंबर 2 समोर हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.

पद्मभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांनी तेंडुलकर यांना सन्मानित केले असून भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मानही क्रिकेटमधून निवृत्ती घेताना देण्यात आला आहे. तसेच भारतीय विमान दलाने त्यास ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केला आहे. असा मान मिळालेला तो पहिला खेळाडू आणि विमान यांची पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस आहे. दरम्यान राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने म्हैसूर विद्यापीठाने सचिनला मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेले आहेत त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदारही होता. मंदिर परिसरात चाहत्यांनी सचिन नावाने जयजयकार करत घोषणा दिल्या. तर काहींना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली.

संस्थानची सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला बघण्यासाठी साईमंदिर परिसरात तसेच मंदिरात हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. सदर गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी संस्थानच्या सुरक्षा विभागाची दमछाक झाली. ऐनवेळी खाजगी सुरक्षा एजन्सीचे बाउन्सर यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी सचिनला गेट नंबर दोन पासून गाडीतून सुरक्षित बाहेर काढले व मंदिराच्या नंदी गेटपर्यंत त्यांना कडेकोट सुरक्षा दिली; मात्र सचिनला गर्दीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी साईबाबा संस्थानची सुरक्षाव्यवस्था कुचकामी ठरली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com