बाजार समितीच्या सचिवांनी परस्पर वाढवून घेतला पगार

बाजार समितीच्या सचिवांनी परस्पर वाढवून घेतला पगार

सहकार खात्याकडून चौकशी सुरू

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – एकेकाळी नावारूपाला आलेली सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजार समितीत सध्या सावळागोंधळ सुरू आहे. सहकार खात्याची परवानगी न घेताच पगार, भत्ते वाढविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकाराची आता चौकशी सुरू झाली आहे.

बाजार समितीची दोन वर्षांपूर्वी निवडणूक झाली. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा राजेंद्र नागवडे यांच्या गटाचे सभापती झाले. मात्र ते अल्पावधीतच नामधारी ठरले. उपसभापतींना सह्यांचे अधिकार आले. बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी परस्पर आपला मासिक पगार, भत्ते मागील एक वर्षांपासून दहा ते पंधरा हजार रुपयांनी वाढविले. यासाठी पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांची परवानगी घेणे आवश्यक असतानाही त्याकडे डोळेझाक करण्यात आली. त्यामुळे या प्रकाराची चौकशी सुरू झाली आहे.

या संस्थेचे श्रीगोंदा, काष्टी, चिंभळा, घोगरगाव असे उपबाजार आहेत. राज्यासह बाहेरचे व्यापारी येथे खरेदीसाठी येत असल्याने कांद्यासह इतर भुसार मालाची आवक, जावक मोठ्या प्रमाणात होते. स्वमालकीचे गाळे असल्याने बाजार समितीचे उत्पन्नही चांगले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीत नागवडे, माजी आ. जगताप गटाची सत्ता समितीवर आली. सभापती म्हणून धनसिंग भोईटे यांची निवड झाली. मात्र ते अल्पावधीतच नामधारी बनले आणि पाचपुते गटाचे उपसभापती वैभव पाचपुते यांच्याकडे सह्यांचे अधिकार आले.

सचिवाच्या कारभाराबाबत प्रकरणे बाहेर येत असून अनेक संचालक सचिवाच्या कारभारावर नाराज आहेत. सचिव डेबरे यांच्या परस्पर वाढवलेल्या पगाराचे प्रकरण समोर आले आहे. त्यांनी सहकार खात्याच्या परवानगीशिवाय आपल्या पगारात भरभक्कम वाढ केली असून याबाबत सहकार विभागाने चौकशी सुरू केली आहे.

कारवाई झाली पाहिजे : भोइटे
बाजार समितीचे सभापती धनसिंग भोइटे यांना याबाबत विचारले असता सचिवाच्या पगारवाढीचा ठराव मीटिंगमध्ये चर्चेला आलाच नसल्याने अधिक सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले. असं काही झाले असेल तर कारवाई झाली पाहिजे, असेही भोइटे म्हणाले.

चौकशी अहवाल देणार
या प्रकाराबाबत श्रीगोंदा सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांना विचारले असता त्यांनी याची चौकशी सुरू असून आपला अहवाल जिल्हा उपनिबंधकांना देणार असल्याचे सांगितले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com