बाजार समितीच्या शहरातील आवारात भाजीपाला विक्रीस मंत्री तनपुरे अनुकूल

jalgaon-digital
2 Min Read

केशव बेरड यांची माहिती : नेप्ती उपआवार शेतकर्‍यांसाठी अव्यवहार्य

अहमदनगर (वार्ताहर)– नगरच्या दादा पाटील शेळके नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणे शेतकर्‍यांसाठी अव्यवहार्य आहे. ग्राहक, अंतर व वेळेचा विचार करता शेतकर्‍यांचा यामुळे तोटा होत असल्याने शेतक-यांच्या सोयीसाठी पुर्वीप्रमाणेच नगर शहरातील बाजार समिती कार्यालयात पुन्हा एकदा फळे व भाजीपाला मार्केट सुरू करावे याबाबत नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्यमंत्री तनपुरे यांनीही जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना करण्याचे मान्य केले असल्याची माहिती नगर बाजार समितीचे माजी संचालक केशव बेरड यांनी दिली आहे.

करोनानंतर लॉकडाउन झाल्यानंतर शहरातील बाजार समितीत भरणार्‍या भाजीपाला बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत होती. त्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांनी नगर शहरातील बाजार समितीतील फळे व भाजीपाला बाजार बंद करून तो नेप्ती उपबाजारात सुरू केला. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे नेप्ती उपबाजारात सध्या भरणारा बाजार सुरू ठेवला तरी चालेल परंतु नगर शहरातील फळे व भाजीपाला बाजार पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.

नेप्ती उपबाजार तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्‍यांसाठी सोयीचे असले तरी बहुतांशी शेतमाल पूर्व, उत्तर व दक्षिण भागातून येतो. या ठिकाणच्या शेतकर्‍यांना नेप्ती उपबाजारचे अंतर दूर वाटते. त्याचप्रमाणे नेप्ती उपबाजारात ग्राहकही कमी येत असल्याने शेतकर्‍यांच्या शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही. याबाबत शेतकर्‍यांनी तक्रारी केल्यामुळे नगर विकास राज्यमंत्री ना. तनपुरे यांना याबाबतची माहिती दिली. राज्यमंत्री तनपुरे यांनी शेतकर्‍यांच्या समस्या ऐकून घेत याबाबत जिल्हाधिकारी व्दिवेदी यांच्याशी चर्चा करण्याचे मान्य केल्याचे बेरड यांनी सांगितले. आगामी काळात शेतकर्‍यांच्या सोयीसाठी जिल्हाप्रशासनाने नगर शहरातील फळे व भाजीपाला बाजार तातडीने सुरू करावा अशी मागणी बेरड यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *