आजपासून मराठी साहित्य संमेलन
Featured

आजपासून मराठी साहित्य संमेलन

Sarvmat Digital

संदीप वाकचौरे

संत गोरोबाकाका साहित्य नगरी सज्ज : ग्रंथदिंडीने प्रारंभ

उस्मानाबाद (संत गोरोबाकाका साहित्य नगरी) – मराठी सारस्वतांच्या व मराठी रसिकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीसाठी व मराठीचा उत्सव संपन्न करण्यासाठी उस्मानाबाद येथील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाला गेली आहे. आजपासून इथे मराठी साहित्याचे सूर उमटण्यास सुरुवात होणार आहे.

मराठवाडा साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने 10 ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी सारस्वतांचे साहित्य संमेलन रंगणार आहे. साहित्य संमेलन ज्या परिसरात होणार या परिसराला संत गोरोबाकाका साहित्यनगरी असे नामकरण करण्यात आले आहे. अंतर्गत असलेल्या साहित्य मंचला लोकशाहीर अमरशेख साहित्य मंच, सेतुमाधवराव पगडी साहित्य मंच व दत्तो अप्पाजी तुळजापूरकर साहित्य मंच असे नामकरण करण्यात आले आहे.

साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत तुळजाभवानी क्रीडा संकुल ते संमेलन स्थळ अशा ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. अकरा वाजता प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

दुपारी साडेतीन वाजता उस्मानाबाद परिसराचे आकर्षण असलेल्या पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. संमेलनाचे उद्घाटन रानकवी पद्मश्री ना.धो. महानोर यांच्याहस्ते होणार आहे तर अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो असणार असून यावेळी मावळते अध्यक्ष डॉ.अरुणा ढेरे उपस्थित राहणार आहेत.

राजकारण्यांना व्यासपीठावर स्थान नाही
सारस्वतांच्या या संमेलनात प्रत्येक वेळेस राजकारण्यांना स्थान देऊन तेच भाव खाऊन जातात त्यामुळे साहित्यिकांचा सन्मान होत नसल्याची भावना यापूर्वी वारंवार व्यक्त करण्यात आली होती. मात्र संयोजकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते. ही बाब लक्षात घेऊन यावेळी संयोजकांच्यावतीने कोणत्याही राजकीय नेतृत्वाला व्यासपीठावर संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे साहित्य संमेलन राजकीय नेत्यांशिवाय पार पडणार आहे. मात्र दरवर्षी शासनाच्यावतीने या साहित्य संमेलनास 50 लाख रुपये देण्यात येतात. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री व पालकमंत्री यांचा सहभाग असतो. मात्र अद्यापपर्यंत तरी राज्याच्या मंत्रिमंडळातील कोण उपस्थित राहणार याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. याला संयोजकाच्यावतीने दुजोरा देण्यात आला आहे.

नगरकरांचा सन्मान
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विविध परिसंवाद व कार्यक्रमांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकही सहभागी होणार आहेत. यात डॉ संजय कळमकर, गीतकार बाबासाहेब सौदागर, डॉ कैलास दौंड यांच्यासह नवोदित कवींचा सहभाग असणार आहे. तर संमेलनाच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील शब्दालय प्रकाशनाच्या प्रकाशक असलेल्या सुमती लांडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com