पावसाची धुव्वाँधार सुरूवात
Featured

पावसाची धुव्वाँधार सुरूवात

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात 1 जूनच्या पहाटे मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. यात श्रीरामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून या ठिकाणी सर्वाधिक 71 मि.मी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 11 तालुक्यात पाऊस झाला आहे. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात या वर्षीच्या सरासरीच्या 5.39 टक्के पाऊस झाला आहे. तर संगमनेर, अकोले आणि राहाता तालुक्यात पावसाची प्रतिक्षा आहे.

हवामान खात्याने रविवारी जिल्ह्यात येणार्‍या तीन दिवसात पावसाचा इशारा दिला होता. त्यानूसार जिल्ह्यात बहुतांशी भागात रविवारी रात्री 8 पासून वादळी वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट होता. मात्र, रात्री 12 नंतर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पहाटे एकनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला. यामुळे जूनच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. मात्र, या पावसाने संगमनेर, अकोले, राहाता आणि कोपरगावला हुलकावणी दिली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नेवासा तालुक्यातील तालुक्यातील सलाबतपूर मंडलात 97 मि.मी., श्रीरामपूर महसूल मंडलात 71 मि.मी. तर टाकळीभान मंडळात 70 मि.मी. झाला आहे. तर अकोले तालुक्यातील शेंडी मंडलात 12 मि.मी., कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका मंडलात 5 मि.मी., राहाता तालुक्यातील बाभळेश्‍वर मंडलात 39 मि.मी., पुणतांबा आणि लोणी मंडलात प्रत्येकी 25 मि.मी. वगळता या तालुक्याची एकूण सरासरी शुन्य टक्के असल्याची जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुकानिहाय सरासरीत सर्वाधिक पाऊस श्रीरामपूर 71 मि.मी., पारनेर 58 मि.मी., कर्जत 55 मि.मी., राहुरी 42.6 मि.मी. नेवासा, शेवगाव आणि श्रीगोंदा प्रत्येकी 31 मि.मी., पाथर्डी 29 नगर 21 मि.मी. आणि जामखेड 15 मि.मी. आणि कोपरगाव 4 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी जिल्ह्यात पावसाची सरासरी शुन्य टक्के होती.

चार मंडलात अतिवृष्टी
जिल्ह्यात पहिल्याच पावसात जिल्ह्यातील 97 महसूल मंडलापैकी चार मंडलात 65 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. 65 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास तो अतिवृष्टीमध्ये गणला जातो. जिल्ह्यातील सलाबातपूर, श्रीरामपूर, टाकळीभान, बेलवंडी या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com