मंगळापूरमध्ये वाळूतस्कराची तलाठ्याला धक्काबुक्की
Featured

मंगळापूरमध्ये वाळूतस्कराची तलाठ्याला धक्काबुक्की

Sarvmat Digital

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, वाळूसह ट्रॅक्टर जप्त

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करून तिची वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल अधिकार्‍यांनी पकडला. संतापलेल्या तिघा वाळूतस्करांनी तलाठ्याला धक्काबुक्की करत दमबाजी केल्याची घटना मंगळवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगळापूर गावाजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर 1 ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.

संगमनेरात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. प्रवरा नदी पात्राच्या सर्वच गावालगत खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. मंगळापूर येथे वाळू उपसा व त्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने संगमनेरचे तलाठी पोमल दत्तात्रय तोरणे हे आपल्या सहकार्‍यांसह मंगळापूर येथे पोहोचले. मंगळापूर गावातील वसुधा डेअरीजवळ त्यांना वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर दिसला. त्यांनी हा ट्रॅक्टर अडवताच दीपक वाळे, राजू वाळे व ट्रॅक्टर चालकाने तोरणे यांना दमबाजी व शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यानंतर ते पसार झाले. महसूल अधिकार्‍यांनी महिंद्रा कंपनीचा 4 लाख 40 हजारांचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच 17 के 1348, ट्रॉली व 1 ब्रास वाळू जप्त केली आहे.

याबाबत तलाठी तोरणे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दीपक वाळे, राजू वाळे व अन्य एका विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 577/2020 भारतीय दंड संहिता कलम 353, 379, 323, 504, 506, 34 पर्यावरण कायदा कलम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com