मालपाणी परिवाराची कोरोनाच्या लढ्यासाठी सव्वा कोटींची मदत
Featured

मालपाणी परिवाराची कोरोनाच्या लढ्यासाठी सव्वा कोटींची मदत

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आपत्ती असो वा धार्मिक, सामाजिक कार्य असो प्रत्येकवेळी आपल्या दातृत्त्वाचा परिचय देणार्‍या संगमनेरच्या मालपाणी परिवाराने ‘कोरोना’शी लढणार्‍या शासन व प्रशासनाला भरीव अर्थसहाय्य केले आहे. स्थानिक पातळीवर कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी ‘संगमनेर सहाय्यता निधीला’ पाच लाखांचा धनादेश दिल्यानंतर आता या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मालपाणी परिवाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान केअर फंडासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये याप्रमाणे एक कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी व मनिष मालपाणी यांनी काल संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्याकडे सुपूर्द केला.

यासोबतच जनकल्याण समितीला 11 लाख, ग्रामीण रुग्णालयांतील सुविधांसाठी 5 लाख, संगमनेरच्या कुटीर रुग्णालयाला 1 लाख, लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या कोरोनाग्रस्त भोजन सेवेसाठी 2 लाख व शहरातील औषध फवारणीसाठी 1 लाख असा एकूण सव्वाकोटीचा निधी देवून मालपाणी परिवाराने आपली समाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

गेल्या सुमारे महिन्याभरापासून ‘कोरोना’ विषाणूंचा कहर रोखण्यासाठी राज्याच्या अर्थव्यवस्थेला जणू टाळे लागले आहे. देशभरातील उद्योगधंदे बंद असल्याने केंद्र व राज्य सरकारांकडे जमा होणारी कररुपी रक्कम बंद झाली आहे. अशा अवस्थेत देशात व राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होवू लागल्याने तपासणी, उपचार यावर खर्च करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची गरज निर्माण झाली आहे.

देशासह राज्यातील सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने शासनाच्या तिजोरीवरही मर्यादा आल्याने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान केअरसाठी तर मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भारतीयांना हाक दिली होती. त्याला संगमनेरातील मालपाणी परिवाराने साथ देत केंद्र व राज्य सरकारसह स्थानिक सहाय्यता निधी, विविध ठिकाणची ग्रामीण रुग्णालये, संगमनेरचे ग्रामीण रुग्णालय अशा सर्वांनाच मदतीचा हात देत कोरोना विरोधातील राष्ट्रीय लढ्यात आपण आघाडीवर असल्याचे दाखवून दिले आहे.

मालपाणी उद्योग समूह राष्ट्रीय आपत्तीतच नव्हे तर कायमच सामाजिक भान जपत आला आहे. संगमनेरातील मालपाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून अवघ्या दहा रुपयांत रुग्ण तपासणी सेवा कोरोनाच्या संकटातही 24 तास उपलब्ध आहे. चार ऑपरेशन थिएटर असलेल्या या रुग्णालयात अत्यल्प दरात सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात. आजपर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. दरवर्षी केवळ एका रुपयात साजरा होणारा सर्वधर्मीय शाही सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे संगमनेरचे वैभवच ठरले आहे.

यासोबतच मालपाणी उद्योग समूहाने स्वच्छ भारत अभियानात राज्यभर कचरापेट्याचे व मंदिरांसाठी निर्माल्य कलशांचे वाटपही केले होते. ‘हरित संगमनेर’च्या स्वप्नपूर्तीसाठी दरवर्षी मोफत दिली जाणारी लाखों रोपे, विविध शैक्षणिक उपक्रमांना आर्थिक सहाय्य, जरूरीप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा, फवारणी अशा अनेक माध्यमातून मालपाणी उद्योग समूहाने सदैव सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोना संकटात मालपाणी परिवाराने दाखविलेल्या या दातृत्त्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यु स्वर्गीय ओंकारनाथ व माधवलाल मालपाणी यांनी मालपाणी परिवारावर सामाजिक बांधिलकीचे मूल्य जपण्याचे संस्कार केले आहेत. करोनाच्या रुपाने देशावर मोठे संकट उभे राहीले आहे. अशावेळी शासन आणि प्रशासनासोबत उभे राहून या महामारीचा सामना करणेे आवश्यक आहे. देशातील उद्योग धंदे ठप्प असल्याने शासन पातळीवर निधीची कमतरता भासू नये यासाठी देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना आज प्रत्येकी पन्नास लाख रुपये याप्रमाणे एकुण एक कोटी रुपयांचा धनादेश प्रशासनाकडे सोपविला आहे. याशिवाय करोनाशी सुरु असलेल्या लढ्यातील अन्य विविध संस्थानांही पंचवीस लाखांची मदत देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com