उद्या पतंग वॉर
Featured

उद्या पतंग वॉर

Sarvmat Digital

नऊतार मांजाने खाल्ला भाव । संक्रांतीसाठी तरुणाई सज्ज

अहमदनगर – संक्रांत आणि तीळगुळाचे नाते जितके घट्टे तितकेच संक्रात अन् पतंगाचेही. संक्रांत म्हटलं की नगरमध्ये आसमंत पतंगांनी फुलतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यत प्रत्येक जण पतंगबाजीचा आनंद घेत असल्याचे चित्र नगरमध्ये दिसून येते. पतंगबाजीसाठी मांजा अन् पतंग खरेदीने बाजारपेठ फुलून गेली आहे. बंदी असलेला चायना मांजाला नऊतार मांजाने बाजारात भाव खाल्ल्याचे चित्र आहे. चोरी छुपके चायना मांजाही विक्री होत असल्याचे दिसून आले.

नगर शहरातील बागडपट्टी, सर्जेपूरा रोड, झेंडीगेट माळीवाडा, भिंगार, सदरबाजार, केडगाव, कायनेटिक चौक, पाईपलाईन रोड, सावेडीगाव, प्रोफेसर कॉलनी चौक, नागापूरसह शहरातील विविध ठिकाणी पतंगाच्या बाजारपेठा व कमानी वेगवेगळ्या आकारातील पतंगानी सजविण्यात आल्या आहेत. लहान मुलांनपासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येकजण संक्रांतीला पंतग उडविण्याचा आनंद घेत असतात.

बागपट्टीतील रस्ते विविध आकर्षक पतंगानी सजविण्यात आले आहे. पतंग तयार करणार्‍या झेंडीगेट येथील दुकानात देखील मोठी गर्दी पाहवयास मिळाली. पतंग उडविण्यासाठी मांजा देखील महत्वाचा असतो.मांजा जितका मजबूत तितका पतंग उडविण्याचा आनंद जास्त असतो. प्रतिस्पर्ध्याचा पतंग कापण्यासाठी देखील मांजा मजबूत असावा लागतो. त्यामुळेच मांजा खरेदी पारखून करण्यावर तरूणाईचा भर असल्याचे दिसले. बरेली, सुरती, पांडा मांजाला पसंती असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून आले. मांजाचा एक रिळ 150 रूपयांपासून 400 रूपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

बाहुबली, वाघ, तिरंगा अन् डोरेमॉन
गरुड, मिकीमाऊस, बाहुबली, फुलपाखरू, वाघ, सुरती, बॉम्बो टाइप, फर्रा, भवरा, तिरंगा आदींसह विविध रंगाच्या कागदी पतंग 3 रूपयांपासून ते 400 रूपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्लास्टिकमध्ये अँग्रीबर्ड, सुपरमॅन, टॉम अ‍ॅण्ड जेरी, छोटा भीम, डोरेमॉन, बार्बी, मोटू-पतलू हे कार्टून पतंगाची बच्चेकंपनीत विशेष मागणी असल्याचे दिसले.

भाज्या महागल्या…
मकर संक्रांतीचा अगोदरचा दिवस म्हणजे भोगी. भोगीच्या दिवशी बारा भाज्यांचे खेंगाट खाण्याची प्रथा आहे. तिळाची भाकरी, तिळाची अंघोळ अन् खेंगाट अशा पारंपरीक पध्दतीने घरोघरी भोगी साजरी झाली. सक्रांतीसाठी लागणारा ऊस, गव्हाची ओंबी,बोरे,तीळ, बाजरी, राळे, गाजरासह भाज्यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

पोलिसांची कारवाई चमकोगिरी
नागरिकांसह पशू-पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरलेला चायना मांजावर प्रशासानाने बंदी घातली आहे. रविवारी पोलिस प्रशासानाने चायना मांजा विक्री करणार्‍यावर कारवाईचा बडगा उगरत कारवाई केली. या कारवाईनंतर देखील अनेक ठिकाणी बंदी असलेला चायाना मांजा सर्रास विकला जात आहे. त्यामुळे पोलिस प्रशासानाने केलेली कारवाई निव्वळ चमकोगिरी असल्यची चर्चा बाजारपेठेत सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com