महाराष्ट्राएवढा असूनही जर्मनीत सव्वालाख कोरोना बाधित

महाराष्ट्राएवढा असूनही जर्मनीत सव्वालाख कोरोना बाधित

जर्मनीत उच्चशिक्षण घेत असलेल्या सोनईच्या तरुणाने दिली माहिती

सोनई (वार्ताहर)- जर्मनीही कोरोनाशी लढा देत असून सव्वालाखाहून अधिक लोक बाधित आहेत तर सव्वातीन हजारांचा बळी गेला असल्याचे जर्मनीत उच्च शिक्षण घेत असलेल्या मुळच्या सोनई (ता. नेवासा) येथील सौरभ संजय भळगट या विद्यार्थ्याने तेथील परिस्थिबाबत जर्मनीतून माहिती देताना स्पष्ट केले.

सोनईचा सौरभ भळगट हा विद्यार्थी सध्या जर्मनीमधील बर्लिन विद्यापीठात लियना मॅनेजमेंट हे व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. तो बव्हेरीया राज्यात एका कंपनीत नोकरीस आहे. इंडस्ट्रीय हब असलेल्या या राज्यातच सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.

तेथील कोरोनाबाबत तो म्हणाला , अमेरिका, इटली व स्पेन पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर असलेला जर्मनी कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतोय. सुमारे 1 लाख 27 हजार 574 पॉझिटिव्ह रुग्ण ही परिस्थिती सर्व काही सांगून जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र पेक्षा थोडासा मोठा देश असताना येथे रुग्णांची संख्या लाखात आहे. साधारणतः 22 जानेवारी रोजी जर्मनीमध्ये पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर सुमारे 5 मार्च 2020 पर्यंत हा रुग्णांचा आकडा बोटांवर मोजण्याइतकाच होता. सरकारने कुठल्याच कठोर उपाययोजना केल्या नाहीत. अचानक हा आकडा 31 मार्च रोजी 71000 वर पोहोचला आणि बघता बघता सर्व काही बदलून गेले.

जर्मनी हा अतिशय शिस्तप्रिय लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशातील नागरिक स्वयंस्फूर्तीने सोशल डिस्टन्स पालन करत असताना, तसेच या देशात आरोग्याशी संबंधित सर्व सुविधा असताना हा देश व्हायरस रोखण्यात कसा काय कमी पडतो ही चिंता माझ्या मनात कायम खंत करत असते.

सध्याच्या भारताच्या परिस्थितीवर तो म्हणाला, मला असे वाटते की, सुदैवाने भारतात कोरोना अजूनही आटोक्यात दिसतोय. पण त्यामुळे माझ्या बांधवांनी हुरळून जाऊ नये. कारण खरी लढाई पुढे आहे. भारत अजूनही तिसर्‍या स्टेजमध्ये पोहोचला नाही. शासनाकडून ज्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत त्या खरोखर वाखाणण्यासारख्या आहेत.

नागरिकांनी खरोखर शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. क्षुल्लक चूक देखील संपूर्ण देशाला महाग पडू शकते. आपल्या देशाला दोन प्रमुख गोष्टींवर लढावे लागणार आहे एक म्हणजे कोरोना विरुद्ध लढा आणि त्यापाठोपाठ येणारी बेकारी. मात्र या कठीण परिस्थितीत मला विश्वास आहे की माझा देश हा संकट मोठ्या हिमतीने परततील व जगासमोर एक नवा आदर्श निर्माण करून देतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com