Friday, April 26, 2024
Homeनगरमहाराष्ट्र दिनी शाळांमध्ये ध्वजारोहण नाही ; साठ वर्षातील पहिलीच वेळ

महाराष्ट्र दिनी शाळांमध्ये ध्वजारोहण नाही ; साठ वर्षातील पहिलीच वेळ

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरच्या साठ वर्षात ही पहिली वेळ आहे की, ज्यादिवशी राज्य स्थापनेच्या वर्धापनाच्या दिवशी शासकीय कार्यालयांमध्ये होणारा ध्वजारोहण कार्यक्रम यावर्षी होणार नाही.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शासकीय, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित या सर्व प्रकारच्या शाळांमध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येऊ नये असे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकार्‍यांनी सर्व पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी यांना दिले आहेत.

- Advertisement -

यापूर्वी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करण्याबाबत काही सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये शाळांमध्ये फक्त मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व एक-दोन शिक्षक यांनी मर्यादित उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करावे. मुलांना बोलविण्यात येऊ नये. अशा प्रकारचे निर्देश दिले होते. त्यानंतर शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी व्हॉट्सअप मेसेजद्वारे राज्यातील शिक्षण विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना शाळांमध्ये ध्वजारोहण न करण्याबाबत कळविले होते.

राज्यात करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने त्याचा संसर्ग एकमेकांना होऊ नये या हेतूने सदरचे ध्वजारोहण रद्द करण्यात आले आहे . महाराष्ट्र दिनी दरवर्षी सर्व शाळांमधून ध्वजारोहण केले जाते. तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालय वगळता अन्यत्र कोठेही ध्वजारोहण होणार नाही असे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्या ठिकाणीसुद्धा उपस्थिती अत्यल्प राहणार असून पोलिसांचे संचालन होणार नाही. तसेच या निमित्ताने दिले जाणारे विविध पुरस्कारांचे वितरण सुद्धा होणार नाही.

राज्यशासन करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असून त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून अत्यंत काळजी घेऊन सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये ध्वजारोहणासारखा महत्वाचा कार्यक्रम देखील शासनाने रद्द केला आहे. त्यामुळे जनतेने सुद्धा शासनाच्या या सर्व उपाययोजनांना प्रतिसाद देऊन घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या