प्रवरेच्या शंभर बेड कोविड 19 रुग्णालयाचे लोकार्पण
Featured

प्रवरेच्या शंभर बेड कोविड 19 रुग्णालयाचे लोकार्पण

Sarvmat Digital

सरकारने निधी व चाचणीची परवानगी द्यावी – डॉ. विखे

लोणी (वार्ताहर)– येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टने अवघ्या सहा दिवसात शंभर बेडचे सुसज्ज कोविड 19 हे स्वतंत्र रुग्णालय उभारले असून गुरुवारी त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरकारने निधी द्यावा व रुग्णांची चाचणी आणि उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनी केली.

देशात आणि राज्यात कोविड 19 चा संसर्ग वाढत असताना लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टने पुढे येत सादतपुर रस्त्यावरील शिक्षण शास्र महाविद्यालयाच्या इमारतीत अवघ्या सहा दिवसात शंभर बेडचे स्वतंत्र व सुसज्ज रुग्णालय उभारले आहे. त्याचे लोकार्पण केल्यानंतर बोलताना डॉ. विखे म्हणाले, प्रवराने नेहमी पुढे येऊन आव्हानांचा सामना केला आहे. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचा निर्माण केलेली परंपरा आमच्यासाठी प्रेरणा ठरली आहे.

शंभर बेडच्या रुग्णालयात सहा अतिदक्षता बेड आहेत. लहान मुलांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून रुग्णांना मोफत उपचार, भोजन, निवास या सुविधा आहेत. डॉक्टर, नर्स, टेक्निशियन व इतर आरोग्य सेवक असा पाचशे पेक्षा अधिक प्रशिक्षित सेवक वर्ग आहे. सरकारने रुग्णालयासाठी निधी द्यावा, उपचार व चाचणीची परवानगी द्यावी, अशी मागणी करताना लोकांनी घरातच व सुरक्षित राहावे असे सांगताना हे रुग्णालयात रुग्ण येऊ नयेत. लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये ही आमची इच्छा आहे. यावेळी कुलगुरू डॉ. राजबीर भलवार, वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. सतीश महाजन, डॉ. ठाकूर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

भाजीसाठी जीव धोक्यात घालू नका : डॉ. महाजन
कोरोना 19 आजाराने संपूर्ण जग हादरले आहे. लाखो लोकांना संसर्ग झाला असून हजारो मृत्यू झाले आहेत.प्रगतशील देश हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत भारत देशाला कोरोनाचा संसर्ग धोकादायक आहे. भाजीपाला घेण्यासाठी लोक गर्दी करून जीव धोक्यात घालीत आहेत. सोशल डिस्टन्सीग पाळले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. वरण-भात खा पण घरातच राहा असे सांगताना लोकांनी घाबरून जाऊ नये, असे मी सांगणार नाही तर लोकांनी घाबरलेच पाहिजे तरच संसर्गाचा धोका कमी होईल. भारत देश सध्या तिसर्‍या स्टेजच्या अगदी जवळ असून कधीही आपण प्रवेश करू शकतो. आपली रुग्णालये, डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय सुविधांचा विचार केला तर आपल्याला पुढे जाणे अजिबात परवडणारे नसल्याने लोकांनी घर सोडू नये. यासाठी कठोर पावले सरकारने तातडीने उचलणे काळाची गरज असल्याचे वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ.सतीश महाजन यांनी स्पष्ट केले.

Deshdoot
www.deshdoot.com