Friday, April 26, 2024
Homeनगरलोणी खुर्दमधील क्लर्क निघाला करोनाबाधित

लोणी खुर्दमधील क्लर्क निघाला करोनाबाधित

14 दिवस लॉकडाऊन; 27 जण ताब्यात; अर्धे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र

लोणी (वार्ताहर)- राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेत नोकरीस असलेल्या व लोणी खुर्द येथे राहणार्‍या आणि कोपरगाव येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेतील क्लर्कलाा करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या संपर्कातील हायरीस्कमधील सात जणांना आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेऊन त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतले. तर राहात्याच्या तहसीलदारांनी लोणी खुर्द गावातील मोठा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करून पुढील चौदा दिवस हा परिसर सील केला आहे.

- Advertisement -

लोणी-पिंपरी निर्मळ रस्त्यालगतच्या विद्यानगरभागात राहणार्‍या क्लर्कला त्रास होऊ लागल्याने त्याने गावातील खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. मात्र त्रास कमी होत नसल्याने या शिक्षकाला लोणी येथील प्रवरा रुग्णालयाच्या कोविड 19 सेंटरमध्ये नेऊन स्रावाची तपासणी केली असता ती र्पाीझिटिव्ह आली. त्यानंतर नगर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तेथेही पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली.

तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, ग्रामीण रुग्णालय लोणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद मैड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आणि शासकीय यंत्रणा बाधित शिक्षकाच्या घरी पोहचली. त्याच्या कुटुंबातील आणि संपर्कातील नऊ हायरीस्क व्यक्तींना ताब्यात घेऊन लोणीच्या कोविड 19 सेंटरमध्ये नेऊन त्यांच्या घशातील स्राव घेण्यात आले. याशिवाय बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आणखी 19 व्यक्तींना शिर्डी येथील साईआश्रममध्ये क्वारंटाइन करण्यात आले.

तहसीलदार यांनी गावातील विद्यानगर, सप्तशृंगीनगर, गणेश कॉलनी, प्रिन्स कॉर्नर, साईनगर, साई कॉलनी, समर्थ कॉलनी, दत्त नगर, पार्वती कॉलनी हा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून सील केला. सर्व रस्ते, दुकाने व नागरिकांची ये-जा बंद करण्यात आली. पुढील 14 दिवस हा परिसर सील राहणार आहे. अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी पाच शासकीय कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. या परिसरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे.

लोणी बुद्रुक व खुर्द ही दोन्ही गावे एकमेकांना जोडलेली असल्याने लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने 7 जूनपर्यंत गाव लॉकडाऊन केले असून दवाखाने, मेडिकल दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली असून इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

भानसहिवरेत वृध्दास करोना

नेवासा तालुक्यात आठवडाभरात करोनाबाधितांची संख्या 4 वर

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- कल्याणवरून आलेली महिला व तिचा नातू करोना संक्रमीत निघाल्यानंतर नेवासा तालुक्यात भांडूप येथून आलेल्या कारेगावच्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता भानसहिवरे येथील एक वयोवृद्ध व्यक्ती करोना संक्रमीत झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.

आठवडाभरात नेवासा तालुक्यात बाहेरून आलेल्या व्यक्तींसह करोना संक्रमितांची संख्या 4 झाली आहे. नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील एक वृद्ध व्यक्ती काल करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या संपर्कातील 4 व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील वृद्ध व्यक्तीला श्वसन संस्थेच्या तक्रारीमुळे तालुक्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना निमोनिया असल्याचे सांगून पुढील उपचारासाठी दुसर्‍या मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. परंतु या वृद्ध व्यक्तीचा नातू पुणे येथे राहत असल्याने या वृद्ध रुग्णाला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ससूनमध्ये तपासणीनंतर करोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तशी माहिती सोमवारी ससून रुग्णालयाच्या यंत्रणेने अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांच्यासह कुकाणा आणि भानसहिवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांनी भानसहिवरा येथे संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन चार व्यक्तींना नगर येथे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या