Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरलॉकडाऊनमुळे गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतिक्षेत

लॉकडाऊनमुळे गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतिक्षेत

कारागीर सापडले आर्थिक अडचणीत

अस्तगाव (वार्ताहर)- दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच गार पाण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणजे माठ बाजारात येत असे. मात्र कोरोनाच्या लॉकडऊनमुळे खरेदी करण्यास कोणीही येत नसल्याने गरिबांचा हा फ्रीज ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे. उन्हाळा लागला की, माठांची त्यांच्या जोडीला रांजण, मडके, यांची आठवण येते. उन्हाळ्यात पाणीही गार पिण्याची इच्छा होते. अलिकडे आता फ्रिज आले असले तरी माठातील पाण्याची चव काही औरच असते. विद्युत फ्रीजमध्ये प्रमाणापेक्षा अधिक थंड पाणी होत असल्याने अनेकांना घशाचे आजार बळावतात.

- Advertisement -

त्यामुळे ते माठातील पाण्याला पसंती देतात. माठ आणि रांजण हे मातीपासून बनविलेले असतात. पोयटा नदी काठाहून आणला जातो. भुसा, व अन्य घटक टाकून ते आवा भट्टीत भाजले जातात. हे काम फेब्रुवारीपर्यंत केले जाते. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच माठांना मागणी असते. मार्च ते मे या तीन महिन्यांत माठांना मोठी मागणी असते. याही वर्षी लाखो रुपयांचे माठ येथील कुंभार समाजाने बनविले आहेत.

यावर्षी मार्च गेला, एप्रिलही सरत आला तरी माठ विकले गेले नाहीत त्यामुळे येथील कुंभार समाजाचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीमवर मार्चपासूनच लॉकडाऊन सुरू झाल्याने ग्राहक घराच्या बाहेर पडत नाहीत. पडले तर ते भाजीपाला अथवा किराणासाठी बाहेर पडतात. परंतु गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणार्‍या माठांना अथवा रांजणांच्या खरेदीसाठी मात्र ग्राहकांची वाणवा असल्याने विक्रेत्याच्या घरासमोर लावलेले माठांचे उतरंड (ढीग) तसेच आहेत.

अस्तगाव येथील कुंभारअळीत 10 ते 12 कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर आहे. त्यांची यामुळे मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. माठ, रांजण, हॉटेलसाठी लागणारे तंदुर भट्टी, बैल, पणत्या, कर्‍हा केळी, स्वयंपाकासाठीची मातीची भांडी, चुल्ही तसेच गणपती बनविले जातात. अस्तगावचे गणपती, आणि तंदुर जिल्ह्यात तसेच राज्याबाहेरही प्रसिध्द आहेत. मात्र आताच्या लॉकडाऊनमुळे येथील कारागीर अडचणीत सापडले आहेत.

सरकारने मदत करावी
मार्चमध्येच माठांना मोठी मागणी असते. ग्राहकांना हवे तसे, हव्या तशा आकाराचे माठ आम्ही मागणीवरुन बनवून देतो. परंतू या हंगामात लॉकडाऊनमुळे एकही माठ विकला गेला नाही. त्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत येथील कारागिर आहे. अक्षय तृतिया चार पाच दिवसांवर आली. कर्‍हा केळीची नितांत गरज असते. मात्र ग्राहक ते खरेदीसाठी येतील अशी अपेक्षा आहे. त्यात आम्ही मर्यादित स्वरुपात हे कर्‍हाकेळी बनविली आहे. सरकारने शक्य झाल्यास कोणत्यातरी रुपाने कारागिरांना मदत करावी.
– सुनिल अष्टेकर, कारागीर.

- Advertisment -

ताज्या बातम्या