Saturday, April 27, 2024
Homeनगरदीड महिन्यात साईंच्या झोळीत अडीच कोटींचे दान

दीड महिन्यात साईंच्या झोळीत अडीच कोटींचे दान

लाखो साईभक्तांकडून घेतले जात आहे ऑनलाईन दर्शन

शिर्डी (प्रतिनिधी) – करोना व्हायरसच्या संकटामुळे दिनांक 17 मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असतानाही दिनांक 17 मार्च ते दिनांक 03 मे 2020 अशा 48 दिवसाच्या कालावधीत साईभक्तांकडून ऑनलाईनव्दारे 02 कोटी 53 लाख 97 हजार 778 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

- Advertisement -

श्री. डोंगरे म्हणाले, देश व राज्यावर आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपायांकरिता व विषाणूची बाधा एकमेकांना होऊ नये म्हणून भारत सरकार व राज्य शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले असून संस्थानच्यावतीने दिनांक 17 मार्चपासून श्रीसाईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. श्री साईबाबांचा महिमा व त्यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहचलेली असून त्यांचा भक्त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे.

दिनांक 17 मार्चपासून मंदिर बंद ठेवण्यात आले असून याकाळात टाटा स्कॉय, संस्थान संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅप्सद्वारे थेट ऑनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्त घर बसल्या घेत आहेत. यामध्ये टाटा स्कॉयवर सुमारे 35 लाख साईभक्त अ‍ॅक्टीवेट असून 01 लाख 12 साईभक्तांनी संस्थानचे मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड केलेले आहे. तर संकेतस्थळावर दररोज सुमारे 8 ते 9 हजार साईभक्त भेट देत आहेत.

श्रीसाईबाबांचे मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद असले तरीही साईभक्तांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरू ठेवली असून जगाच्या व देशाच्या कानाकोपर्‍यातून साईभक्त संकेतस्थळाव्दारे व मोबाईल अ‍ॅप्सद्वारे ऑनलाईन देणगी संस्थानला पाठवत आहेत. दिनांक 17 मार्च ते 03 मे 2020 अशा 48 दिवसांच्या याकालावधीत साईभक्तांकडून ऑनलाईनव्दारे 02 कोटी 53 लाख 97 हजार 778 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याचे श्री. डोंगरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या