Friday, April 26, 2024
Homeनगरलॉकडाऊन विवाह सोहळ्यांना ‘ब्रेक’

लॉकडाऊन विवाह सोहळ्यांना ‘ब्रेक’

अनेक व्यवसाय अडचणीत कोट्यवधीची उलाढाल थांबली

संगमनेर (वार्ताहर) – जगभरात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असताना संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे यावर्षीचा लग्न सोहळे पूर्णता थांबले आहेत. त्यामुळे नवविवाहितांचे विवाह लांबणीवर पडण्या बरोबरच वाजंत्री, किराणा दुकानदार, मंगल कार्यालय यासारख्या अनेकांच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

- Advertisement -

गेले दीड महिन्यापासून करोनाच्या भितीमुळे सामान्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यात यावर्षी मार्च एप्रिल महिना हा लग्नसराईचा कालावधी म्हणून ओळखला जातो. त्यात अनेक तरुण-तरुणींचे विवाह जमलेले असतात तर अनेकदा या कालावधीत विवाहदेखील जमविल्या जातात मात्र लॉकडाउन झाल्यामुळे या कालावधीत नवविवाहितांचे विवाह जुळण्यात अडचण निर्माण झाली आहे तर ज्यांचे विवाह जमले होते, तारखा निश्चित झाल्या होत्या त्यांचे विवाह आता दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता मावळली आहे.

कारण सध्या देशभरात लॉकडाऊन बरोबरच संचारबंदी जारी असल्यामुळे पाच लोकांपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येता येत नाही. परवानगी काढून विवाह करायचा म्हटला तरी 20 लोकांपेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत विवाह करणे अवघड झाले आहे. त्याचा विपरीत परिणाम विवाह संस्कृती वरती अवलंबून असणार्‍या छोट्या छोट्या व्यावसायिकांवरही झाल्याचे चित्र आहे.

वर्षभरात केवळ विवाहाच्या निमित्ताने कमाई करू पाहणारे बँडपथक यांचा पूर्ण धंदाच या कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे या पथकातील लोकांना रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे. तर विवाहाच्या निमित्ताने लग्नपत्रिका छपाई करणारेही अडचणीत सापडले आहेत. त्याच बरोबर विवाहाच्या निमित्ताने हजारो लोकांच्या पंक्ती उठण्याची परंपरा असलेल्या विवाहाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर ती किराणा दुकानात उलाढाल होत असते त्यामुळे उलाढाल होणार नाही असे किराणा दुकानदार व्यवसायिकांनी सांगितले.

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ती उन्हाळ्यात होणारी लग्ने लक्षात घेता शहरात व ग्रामीण भागातही विवाहाच्या नोंदणी करून मंगल कार्यालयात तारखा हाउसफुल होत होत्या. यावर्षी पूर्वीच तारखांची बुकिंग झालेली होती आत्ता लॉकडाऊनमुळे त्या तारखाही रद्द झाल्या आहेत. नवीन विवाह होण्याची आशा मावळल्या आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिना पूर्णता तारखांचे शिवाय जाणार असल्यामुळे मंगल कार्यालयाना उत्पन्नाचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे.

त्याचबरोबर ग्रामीण भागात पत्रावळीचा व्यवसाय करणार्‍या छोट्या-छोट्या व्यवसायिकांच्या व्यवसायवरती त्याचा विपरीत परिणाम झाला आहे, तर ग्रामीण भागात शिरई, टोपले बनविणार्‍या घरगुती उद्योगातील लोकांना देखील त्याचा फटका बसला आहे. विवाहाच्या निमित्ताने वधू-वर यांच्या कपड्यांसह मोठ्या प्रमाणावरती साडी, टॉवेल, टोप्या यासारख्या साहित्याची खरेदी होत असते. एका विवाहाच्या निमित्ताने देखील लाखोच्या घरात उलढाल जात असते. यावर्षी विवाहाच्या तारखाच निघून देखील विवाह होणार असल्यामुळे कापड व्यवसायिकांची उद्योगही अडचणीत सापडले आहेत.

भारतीय परंपरेत विवाहाच्या निमित्ताने सोन्याची मोठ्या प्रमाणावरती उलाढाल होत असते. लग्नसराईत होणारी सोन्याची उलाढाल यावर्षी पूर्णता संपुष्टात आली आहेत. त्याचबरोबर यावर्षीची अक्षयतृतिया देखील लॉकडाऊन मध्येच आल्यामुळे नवीन खरेदी पूर्ण थांबली आहे. त्यातच सोन्याचा भाव अर्धा लाखावरती पोहोचल्याने गरिबांना सोने खरेदी करणे परवडणारे नाही. अशा परिस्थितीत गरिबांना सोने परवडत नाही आणि सराफी व्यवसाय लॉक डाऊनलोड होत नाही अशा दोन्ही अंगाने व्यवसाय अडचणीत सापडले आहे.

आचारी आले अडचणीत
विवाहाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर ती अन्न शिजवण्यासाठी आचारी लागत असतात. विवाहाची तारखाच निघत नाहीत, व्यवहार होत असल्यामुळे त्यांचे रोजंदारी पूर्णता बुडाल्यात जमा आहे. त्यामुळे दरवर्षी या तीन महिन्यात पूर्ण भरून असलेल्या तारखा रिकाम्या गेल्यामुळे आचारी वर्गावर पोटापाण्यासाठी वेगळा मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वर्षभरातील मिळणारी रक्कम यावेळी मिळण्याची शक्यता मावळली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या