लॉकडाऊनच्या काळातही शुभारंभाची स्पर्धा
Featured

लॉकडाऊनच्या काळातही शुभारंभाची स्पर्धा

Sarvmat Digital

आ. विखे यांच्या पाठोपाठ आ. कानडेंनी केला कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कृषि उत्पन्न बाजार समितीने कापूस खरेदी विक्री महामंडळाच्या सहकार्याने सुरू झालेल्या कापूस खरेदी केंद्राचा लाभ परिसरातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना निश्चित होईल, असा विश्वास माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बाजार समिती श्रीरामपूर आणि कापूस खरेदी विक्री महामंडळाच्या सहकार्याने हे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादित केलेला कापूस या केंद्रावर हमीभावाने देणे सोयीस्कर होणार आहे. या केंद्राचा कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ. विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे पदाधिकारी आणि संचालकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून हा शुभारंभ केला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन व पणन महासंघाच्यावतीने काल श्रीरामपूर येथे आ. लहू कानडे यांचाहस्ते ठरल्याप्रमाणे कापूस खरेदीस प्रारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला.

यावेळी पणन महासंघाचे अधिकारी अजय गिरमे, एम.आय. डी.सी. येथील साई जिनिंगचे मालक पवार, बाजार समितीचे सभापती, संचालक तसेच कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पणन महासंघाचे अजय गिरमे म्हणाले की, बाजार समितीमध्ये कापूस घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांना येथे टोकन देण्यात येईल व ज्यांना टोकन दिले आहे तेवढीच वाहने एमआयडीसी येथील साई जिनिंग फॅक्टरी येथे येतील व तेथेच कापसाचे वजन व ग्रीडिंग करून शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करण्यात येईल.

आ. कानडे यांनी साथीच्या रोगाचा कालखंड लक्षात घेता शासनाचा सूचनेप्रमाणे योग्य अंतर ठेऊन व नियमांचे पालन करून शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Deshdoot
www.deshdoot.com