लॉकडाऊन काळातही ‘तिरट’ ‘बावन्न पत्ते’चा जुगार तेजीत

लॉकडाऊन काळातही ‘तिरट’ ‘बावन्न पत्ते’चा जुगार तेजीत

ना कोरोनाची भिती, ना पोलिसांचा धाक : झाडाच्या आडोशाला रंगतात डाव

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच गर्दी टाळण्या करीता नागरिकांनी घरीच थांबावे, विनाकारण फिरू नये यासाठी प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरू आहे. मात्र जुगारी आपला धंदा सोडण्यास तयार नाहीत. काम नसल्याने शहरासह ग्रामीण भागात जुगाराचे डाव रंगत आहेत. जुगारी तिरट, बावन्न पत्त्यांच्या खेळात मश्गुल आहेत. एक महिन्याच्या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यात छापे टाकून सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

30 जुगारी विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. कोरोना बंदोबस्तामुळे कारवाईस वेळ मिळत नसल्याने, जुगार्‍यांचे फावत आहे. मात्र यातून कोरोनाचा धोका वाढण्याचीही भिती व्यक्त होत आहे.

सुरवातीला जिल्ह्यात कोरोना बांधित रोगाची संख्या कमी होती. यानंतर बांधित रुग्णांची संख्या वाढत जाऊन ती 31 वर गेली. यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना करून जिल्हात संचारबंदी व जमावबंदीची कडक अंमलबजावणी केली. नागरिकांनी घरामध्ये थांबण्यासाठी पोलीस दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. पोलीस कोरोना बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने काही लोकांनी याचा गैरफायदा घेतला आहे. घातक रसायनाचा वापर करून बोगस दारू निर्मिती करणे, हातभट्टी दारुची निर्मिती करणे असे कारनामे पोलिसांनी उघड केले.

शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोक दाखल झाले आहे. तर, ग्रामीण भागातील शेतीची कामे वगळल्यास इतर बाकी सर्व कामे बंद आहे. तसा पूर्वी पासून जिल्हा अवैध धंद्यात पुढे आहे. मग लॉकडाऊन काळात हे धंदे बंद कसे राहतील? सध्या गावागावात जुगाराचे डाव रंगले आहेत. ग्रामीण भागात शेतामध्ये एकत्र येऊन मटण, चिकन पार्टी करणे, जुगार खेळणे हा दिनक्रम सध्या जिल्ह्यातील सर्वच भागात सुरू आहे. याकडे स्थानिक पोलिसांना कारवाई करण्यास वेळ मिळत नसल्याने व काही पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने जुगारी चालकांचा धंदा लॉकडाऊन काळातही तेजीत आहे.

एकीकडे कामधंदा नसल्याने उपासमारीची वेळ आलेली अनेक कुटुंबे असताना दुसरीकडे जुगारावर पैसा उडविणारेही आहेत. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या जुगारीला ना कोरोनाची भिती, ना पोलिसांच्या कारवाईची. उद्योग बंद, हाताला काम नाही. घराबाहेर पडता येत नाही. यामुळे शेतात, आडोशाला जुगाराचे डाव रंगले आहेत. रात्री बॅटरीच्या उजेडातही रानावनात हे डाव रंगत असल्याचे चित्र आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दारू विरोधात कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तसेच जुगारी विरोधात कारवाईची मोहीम राबविणे आता गरजेचे आहे.

सुमारे साडेतीन लाख जप्त
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लॉकडाऊन काळात एप्रिलमध्ये कर्जत, राहुरी, पाथर्डी, सोनई, तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत कारवाई करत तीन लाख, 32 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 30 जुगारी विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. यामध्ये सर्वात मोठी कारवाई दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मोकळओहळ गावच्या शिवारात केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com