लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे : पोलीस अधीक्षक
Featured

लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे : पोलीस अधीक्षक

Sarvmat Digital

भोंग्यांना परवानगी नाही : मौलवी, धर्मगुरूंची बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमधील सामाजिक विलगीकरणाबाबतच्या राज्य शासनाच्या सूचनांचे पालन मुस्लिम बांधवांनी रमजानच्या महिन्यामध्ये करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. याच काळात 24 एप्रिलपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी मुस्लिम बांधवांना काही सूचना करण्यासाठी मंगळवारी पोलीस मुख्यालयातील एपी लॉन्स येथे जिल्ह्यातील मौलाना, धर्मगुरु यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, दिपाली काळे-कांबळे, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व सुमारे दीडशे मौलाना उपस्थित होते.

पवित्र रमजान महिन्यातही सामाजिक विलगीकरणाच्या नियमांचे पालन कटाक्षाने करावे, कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह आणि इफ्तारसाठी एकत्र येऊ नये, घराच्या, इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये, मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येऊ नये, कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्र येऊन साजरे करू नये, मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार आदी धार्मिक कार्य पार पाडावे, असे आवाहन अखिलेश कुमार सिंह यांनी केले.

मशिदीवर असलेल्या स्पीकर, भोंग्यांना परवानगी देता येणार नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. स्पीकर वाजल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले. सर्वांनी घरातच नमाज पठण करून, गर्दी टाळावी. कोणत्याही प्रकारची खाद्य दुकाने लावता येणार नाहीत. उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्वांनी लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा पोलिस दलाने केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com