लॉकडाऊनच्या माध्यमातून देवळालीत नगराध्यक्षांची नागरिकांवर दहशत
Featured

लॉकडाऊनच्या माध्यमातून देवळालीत नगराध्यक्षांची नागरिकांवर दहशत

Sarvmat Digital

शासकीय कामात ढवळाढवळ; समर्थक आणि पालिका कर्मचार्‍यांच्या मुजोरीने नागरिक हैराण

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- करोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले असताना देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात लॉकडाऊनच्या नावाखाली नगराध्यक्ष सत्यजित कदम शासकीय कामात हस्तक्षेप करत नागरिकांवर दहशत निर्माण करून हुकूमशाही गाजवित आहेत. याची चौकशी करून संबंधित नगराध्यक्ष व त्यांच्या हस्तकांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अजित कदम यांनी केली आहे.

राहुरी फॅक्टरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गणेश भांड, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, आप्पासाहेब ढूस, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील कराळे, राहुरी फॅक्टरी अध्यक्ष विजय गव्हाणे, कामगार नेते नानासाहेब कदम आदी उपस्थित होते. अजित कदम म्हणाले, देवळाली प्रवरा येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी राहुरीचे तहसीलदार एफ. आर.शेख, पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन देऊन देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत उद्भवलेल्या विविध समस्यांबाबत चौकशीची मागणी केली आहे.

अजित कदम म्हणाले, देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत 45 दिवसांपूर्वी लॉकडाऊन झाल्यापासून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. नागरिकांनी वेळोवेळी आमच्याकडे तक्रारी केल्या. संकटकाळात राजकारण केले असे म्हणण्याची संधी मिळू नये, म्हणून आम्ही शांतता घेतली. मात्र, त्यांची मनमानी सुरूच आहे. शहराची रचना 20 टक्के लोक गावठाणात तर 80 टक्के वाड्यावस्त्यांवर राहतात.

प्रत्येक नागरिकाला वाड्यावस्त्यांवरून गावठाणात संपर्क करून औषधे, रुग्णालये, बँका, किराणा, दूध, पीठगिरणी आदी ठिकाणी व्यवहार करण्यासाठी गावाशी संपर्क ठेवावा लागतो. नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी अनधिकृतरित्या गल्लीबोळात व गावाशी संपर्क जोडणार्‍या रस्त्यांवर बांबू लावून नाकाबंदी केली. प्रत्येक नागरिकास गावात येण्यास सक्त मनाई करण्यात आली. अत्यावश्यक सेवांपासून वंचित करण्यात आले. मात्र, मर्जीतील लोकांना लॉकडाऊनमधून शिथिलता देऊन नागरिकांत दुजाभावाची वागणूक दिली आहे.

नगराध्यक्ष कदम यांनी स्वमालकीच्या चारचाकी वाहनास अनधिकृत सायरन बसवून सायरन वाजवून नागरिकांवर दहशत निर्माण केली. लॉकडाऊन काळात राजकीय द्वेष मनात ठेवून शहरातील दूध संकलन करणार्‍या संस्थेच्या व स्वतःच्या पक्षाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांची अडवणूक करून दूध संकलन केंद्र बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

देवळाली प्रवरा येथील अनधिकृत बंद केलेल्या रस्त्यांवर नगराध्यक्षांच्या आदेशानुसार मुजोर कर्मचार्‍याने प्रसुतीसाठी चाललेल्या अल्पसंख्याक कुटुंबातील महिलेला नाकाबंदीवर थांबवून जाण्यास अडवणूक केली. त्यावेळी त्या महिलेचे बाळ उदरातून अर्धवट बाहेर आलेले असताना मुजोर कर्मचार्‍याला दया आली नाही.

स्वस्त धान्य दुकानाबाबत धान्य वितरणात काळाबाजार झाला असून त्याची माहिती मिळावी. राजकीय द्वेषाने होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची माहिती मिळावी. जिल्हाधिकारी यांच्या नियमानुसार दुकाने नागरिकांसाठी तात्काळ खुली करण्यात यावी. नागरिकांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून भाजीपाला विक्रीस नियमानुसार परवानगी मिळावी आदी मागण्या अजित कदम यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केल्या आहेत.

निवेदनावर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, गणेश भांड, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, शिवसेना देवळाली शहरप्रमुख सुनील कराळे, राहुरी फॅक्टरी शहरप्रमुख विजय गव्हाणे, शेतकरी नेते आप्पासाहेब ढूस, नगरसेवक शैलेंद्र कदम, कामगार नेते नानासाहेब कदम, शरीफ शेख, प्रमोद बर्डे, रावसाहेब मुसमाडे, गंगाधर गायकवाड आदींची नावे आहेत.

आरोपींवर जुजबी कारवाई
लॉकडाऊन काळात समर्थकांकरवी दर्ग्यात जाऊन धुडगूस घातला. याबाबत दर्ग्याचे प्रमुख अकिलबाबा पटेल यांनी राहुरी पोलिसांत तक्रार केली असता जुजबी गुन्हा दाखल करून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी आरोपींना उठबशा काढण्याची शिक्षा दिली. याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्वपक्षियांच्यावतीने करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com