लॉकडाऊननंतर पतसंस्थांच्या थकीत कर्ज वसूलीसाठी गतीमान प्रयत्न
Featured

लॉकडाऊननंतर पतसंस्थांच्या थकीत कर्ज वसूलीसाठी गतीमान प्रयत्न

Sarvmat Digital

जिल्हा उपनिबंधकांचे पतसंस्था चालकांना आश्वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांच्या मागे सहकार खाते भक्कम पणे उभे आहे, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी देत, लॉकडाऊन संपल्यानंतर पतसंस्थांचे थकीत कर्ज वसुलीची यंत्रणा गतिमान करण्याच्या स्थैर्यनिधी संघाच्या मागणीस त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कोरोनामुळे लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील पतसंस्थांचे काम व्यवस्थित चालावे, पतसंस्थांना भेडसावत असलेल्या प्रश्नांवर मार्ग निघावा, यासाठी स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पतसंस्थांच्या पदाधिकारी यांच्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारे जिल्ह्यात प्रथमच पतसंस्थांचे प्रश्नांबाबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चासत्र झाले.

या चर्चासत्रात 26 पतसंस्थांच्या पदाधिकार्‍यांनी सहभाग घेत प्रश्न मांडले. या चर्चासत्रात जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी पतसंस्थांचे प्रश्न समजून घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी यावेळी पतसंस्थांचे विविध प्रश्न यावेळी मांडले.

पतसंस्थांना स्थैर्यनिधी सहकारी संघ पाठबळ देत असून पतसंस्थांचे प्रश्न शासन दरबारी मांडून मार्ग काढत आहोत, त्यामुळे या लॉकडाऊन काळात पतसंस्थांनी आपले काम पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे करावे, असे आवाहन स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केले. राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर यांच्याकडे पतसंस्थांच्या प्रश्नांचे गार्‍हाणे मांडले असून जर एखाद्या संस्थेची आर्थिक तरलता कमी झाली असेल तर अशा पतसंस्थांचे सुरक्षित व नियमित कर्ज राज्य सहकारी बँक टेकर करून पतसंस्थांना निधी उपलब्ध करून देण्यास तयार असल्याची माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

राज्य पतसंस्था फेडरेशनच्या व्यवस्थापिका सुरेखा लवांडे यांनी पुण्याहून या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. यावेळी स्थैर्यनिधी संघाचे संचालक कडुभाऊ काळे, शिवाजी कपाळे, अशोक कटारिया, मधुकर नवले, विठ्ठल चासकर, रवी बोरावके, राणीप्रसाद मुंदडा, सुशीला नवले, अशोक शिंदे, उमेश मोरगावकर, आदिनाथ हजारे आदींनी विविध विषयांवर चर्चा केली.

करोनाच्या या संकट काळात स्थैर्यनिधी सहकारी संघ सर्व सभासद पतसंस्थांच्या मागे खंबीरपणे उभी असून पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यास तत्पर आहोत, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील सर्व पतसंस्था चालू असून आर्थिक सेवा देत आहेत. मात्र सर्वत्र कर्फ्यू असल्याने पतसंस्थांच्या कर्मचार्‍यांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी व तालुका तहसीलदार यांनी कर्मचार्‍यांना पास द्यावेत, अशी मागणी यावेळी उपनिबंधक आहेर यांच्याकडे करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com