कर्जमाफीच्या दुसर्‍या यादीत जिल्ह्यातील अडीच लाख!

कर्जमाफीच्या दुसर्‍या यादीत जिल्ह्यातील अडीच लाख!

निवडणुकीची चार गावे वगळली : आधार प्रमाणीकरण सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. या यादीत नगर जिल्ह्यातील दोन लाख 52 हजार शेतकर्‍यांचा समावेश असून ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या दोन गावांतील शेतकरी आणि आधी कर्जमाफी दिलेल्या राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी आणि नगर तालुक्यातील जखणगाव येथील शेतकरी वगळून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील पिंपरी घुमट व विळद अशी निवडणुका होणार्‍या गावांची नावे आहेत.

कर्जमाफी मिळणार्‍या शेतकर्‍यांमध्ये नगर जिल्हा राज्यात अव्वल राहणार आहे. जिल्ह्यातील 2 लाख 53 हजार 455 शेतकर्‍यांची कर्जखाती कर्जमाफीसाठी सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. यातून पात्र असणार्‍या शेतकर्‍यांचे नावांचे आधार प्रमाणिककरण करण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी पात्र शेतकर्‍यांची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात 2 हजार 235 कर्ज खात्यांचे प्रमाणिकरण झालेले आहे.

गावोगावी याद्या होणार प्रसिध्द
शनिवारी दुपारी उशीरा सरकारच्या पोर्टलवर कर्जमाफी असणार्‍या शेतकर्‍यांची यादी जाहीर झाली. त्यानंतर काही गावात पोर्टलवरील याद्यांच्या प्रती काढून त्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तर काही गावात आज या याद्या प्रसिध्द होणार आहेत. जिल्हा बँकेची शाखा, तलाठी कार्यालय, तालुका सहनिबंधक, तहसील कार्यालय आणि आपलं सरकार केंद्रात या याद्या लावण्यात येणार आहेत. शनिवारी जिल्ह्यातील काही गावांमध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांची यादी प्रसिध्द झाली आहे. काही गावांमध्ये प्रसिध्द होणे बाकी आहे. रविवारी देखील ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यात 34 लाख शेतकर्‍यांना लाभ
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंतर्गत आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 15 हजार 358 शेतकर्‍यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली होती. शेतकर्‍यांची कर्ज खाती आधार कार्डशी जोडून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येत आहेत. राज्यातील सुमारे 34 लाख शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, तसेच कर्जमाफी योजनेत अचूकता यावी, हा टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यामागील उद्देश असल्याचे यापूर्वीच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील स्पष्ट केलेले आहे.

शेतकर्‍यांच्या अडचणी तात्काळ सोडवा : मुख्यमंत्री
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 21 लाख 82 हजार शेतकर्‍यांची दुसरी यादी सहकार विभागाने शनिवारी प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकर्‍यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात आतापर्यंत एक लाख 25 हजार 449 शेतकर्‍यांचे प्रमाणीकरण झाले असून आज रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकेत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com