कर्जमाफीची यादी जाहीर, प्रत्यक्ष लाभ
Featured

कर्जमाफीची यादी जाहीर, प्रत्यक्ष लाभ

Sarvmat Digital

आजपासून कर्जदार शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सायेब, मागच्या काळात कर्जमाफीसाठी लईवेळा हेलपाटे मारावे लागले. मागच्या सरकारच्या आणि आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीत फरक आहे. त्यावेळी लय तखलीफ झाली. यंदा मात्र, फक्त थम्ब (अंगठा) दिला, अन् काम झालं. अगदी सुटसुटीत आहे आताची कर्जमाफी!, राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावच्या पोपटराव भानुदास मोकाटे यांची ही भावना.

त्यांनी सोमवारी ती थेटपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवली आणि या दोघांनीही, ही भावना म्हणजे या सरकारसाठी आशीर्वादच आहेत. आनंदात राहा, सुखाने प्रपंच आणि शेती करा. मात्र, त्याचसोबत तुमचे आशीर्वाद सरकारवर कायम असून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात सोमवारी झाली. प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील याद्यांचे प्रसिद्धीकरण करण्यात आले. दुपारी एक वाजता मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्रालयातील इतर मंत्री तसेच अधिकारी यांनी नगर, परभणी आणि अमरावती जिल्ह्यातील काही गावांतील पात्र लाभार्थीं यांच्याशी थेट व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला.

नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) आणि जखणगाव (ता. नगर) येथील शेतकर्‍यांना या संवादाची संधी मिळाली. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुपारी एक वाजता या संवादास सुरुवात केली. राज्यात कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीत प्रथम क्रमांकावर असलेल्या नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी त्यांनी सर्वप्रथम संवाद साधला. सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील कोणत्या गावातून आलात, हे विचारले. त्यानंतर पोपटराव मोकाटे यांच्याशी सुरुवातीला उपमुख्यमंत्री पवार यांनी संवाद साधला. किती कर्ज होते? कशासाठी घेतले…अशी विचारणा केली. त्यावर पोपटरावांनी ऊसासाठी 28 हजार रुपये कर्ज घेतले. त्यावरील व्याजासह 32 हजार रुपये झाल्याचे सांगितले. हे कर्ज माफ होणार असल्याने अतिशय आनंद आहे. प्रशासन आणि सरकारचं खरोखरंच आभार, असे त्यांनी सांगितले.

पोपटरावांनी आभार मानताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आभार कसले… हे तर कर्तव्यच असल्याचे सांगितले आणि तुमचे आभाराचे शब्द म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी पोपटराव सरकारच्या या कर्जमाफीवर शंभर टक्के समाधानी असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकार्‍यांना डोेके शांत ठेवून कर्जमाफीची प्रक्रिया राबवा, बळीराजाला दुखावू नका, त्यांची कामे वेळेत पूर्ण करा. स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण होण्यात वेगळेच समाधान असते.

राज्यातील लाखो शेतकर्‍यांना आधार देणारी योजना केवळ 60 दिवसांत पूर्ण करण्यात आली. योजनेत उणीवा जाणवत असल्यास त्रागा करू नका. आपण शेतकर्‍यांवर उपकार करत नाहीत. आपण देणार्‍याच्या नव्हे, तर शेतकर्‍यांचे आशिर्वाद घेणार्‍याच्या भूमिकेत आहोत. मे महिन्यांत योजना पूर्ण करावयाची आहे. आपण ही योजना आणलीय. ती कमी वेळेत पूर्ण करण्याचे श्रेय प्रशासनाला जाते, असे कौतुकोद्गारही काढले.

या संवादासाठी ब्राह्मणी येथील उषाबाई हापसे, मीराबाई हापसे, गणपत जाधव, पोपट मोकाटे, संतोष ठुबे, दिलीप तारडे, राजेंद्र बानकर, पंढरीनाथ बानकर, पोपट ठुबे, भास्कर ठुबे हे पात्र शेतकरी तर जखणगाव येथील रामचंद्र जाधव, बाळू वाळके, पंकज पवार, बंडू वाळके, छाया पवार, अशोक भिसे, विष्णू कर्डिले, बेबी कर्डिले, उमराव शेख, विठ्ठल वाळके आदी उपस्थित होते. या कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया जलदगतीने मार्गी लागावी, यासाठी स्वत: जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्वीजय आहेर, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, सहकार विभागाचे तालुका सहनिबंधक, गटसचिव, तलाठी, बँकांचे अधिकारी-कर्मचारी काम करीत आहेत. ब्राह्मणी व जखणगाव या दोन गावांच्या यादी प्रसिद्धीकरण, आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित तहसीलदार एफ. आर. शेख आणि उमेश पाटील तसेच सहकार विभागाच्या अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यामुळेच दोन्ही गावांतही पहिल्याच दिवशी 972 खातेदारांपैकी जवळपास 50 टक्के आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्णही झाले होते.

कर्जमाफीच्या पहिल्या दिवशी ब्राम्हणी गावातील 972 तर जखणगावातील 279 खातेदारांच्या खात्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात येणार आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत यातील 50 टक्के काम पूर्ण झाले होते. आजपासून कर्जदार शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकेचे 2 लाख 58 हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र असून राज्यात सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ 2 हजार 293 कोटीचा नगर जिल्ह्याला मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. नाशिक विभागात 7 लाख 53 हजार पात्र कर्जदार असून त्यांना 5 हजार 600 कोटींचा लाभ मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त माने यांनी दिली.

यावेळी शेतकरी राजेंद्र बानकर यांनी कर्जमाफी योजनेचे कौतुक करत त्यांचे 1 लाख 98 हजार रुपयांचे पिककर्ज माफ झाल्याचे सांगितले. तर मिराबाई हापसे यांनी 1 लाख 13 हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे सांगत आनंद व्यक्त केला. जिल्ह्यातील आधार प्रमाणिककरणाची पहिली पावती ब्राम्हणी गावातील देशमुख यांची निघाली. विभागीय आयुक्तांच्या हस्ते तिचे वितरण करण्यात आले.

कोणत्या कारखान्याला ऊस घालता : अजितदादा
शेतकरी पोपटराव यांच्यासोबत संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या शेतात काय आहे, अशी विचारणा केली. त्यावर पोपटराव यांनी ऊस आहे, असे उत्तर दिले. त्यावर कोणत्या कारखान्याला ऊस घातला अशी विचारणा करताच पोपटराव यांनी तनपुरे कारखान्याला उत्तर देताच पवार म्हणाले, तनपुरे तर यंदा बंद आहे. त्यावर पोपटराव यांनी संगमनेरला ऊस देणार असल्याचे सांगताच थोरात साहेब इथेच बसलेले आहेत, असे म्हणत ते चांगला भाव देत असल्याची टिप्पणी केली आणि एकच हशा झाला.

28 पासून उर्वरित गाव प्रक्रिया
राज्य सरकारच्या कर्जमाफीला सोमवारपासून सुरूवात झाली असून ही दोन गावे वगळून जिल्ह्यातील उर्वरित गावात कर्जमाफीची प्रक्रिया 28 तारखेपासून सुरू होणार आहे. तसेच एकाच कर्जदाराची दोन कर्ज खाती असल्यास आणि दोन्हीची रक्कम दोन लाखांच्या आत असल्यास त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यात मिळणार 2 हजार 296 कोटींचा कर्जमुक्तीचा लाभ

2 लाख 58 हजार शेतकरी पात्र- जिल्हाधिकारी, तक्रारींवर तात्काळ निर्णय होणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत नाशिक विभागात 7 लाख 53 हजार 103 शेतकर्‍यांना 5 हजार 600 कोटी तर नगर जिल्ह्यात 2 लाख 58 हजार 787 शेतकर्‍यांना 2 हजार 296 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ दिला जाणार आहे. आधार प्रमाणीकरणाच्या माध्यमातून त्याची आज खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. आज जिल्ह्यातील ब्राह्मणी व जखणगाव गावातील शेतकर्‍यांच्या याद्या प्रातिनिधीक स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानंतर यादीनुसार शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण सुरू करण्यात आले. दिनांक 28 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्वच गावांत याद्यांची प्रसिद्धी होऊन आधार प्रमाणीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिली.

या योजनेचा सर्वाधीक लाभ नगर जिल्ह्याला मिळणार आहे. योजनेचा अंतिम टप्पा सुरु झाला असून महसूल आणि सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी-कर्मचारी कर्जमुक्ती योजनेच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत. कोणत्याही शेतकर्‍यांकडून तक्रार येऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. आधार प्रमाणीकरण अथवा थकीत कर्ज रकमेबाबत कोणाची तक्रार असल्यास ती तालुका किंवा जिल्हा समितीकडे सादर करण्यात येणार असून त्यावर तात्काळ निर्णय घेतला जाणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com