श्रीरामपूर शहरालगतही आलाय बिबट्या..!

श्रीरामपूर शहरालगतही आलाय बिबट्या..!

विद्यानिकेतन स्कूल परिसरातील घटना

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – बेलापूर रोडवरील विद्यानिकेतन इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मुलाला घरी घेऊन येत असताना महावीर पाटणी यांना रस्त्यात बिबट्याचा बछडा आडवा गेला. तर दोन दिवसांपूर्वी ऐनतपूर येथील कुताळ वस्तीवरही उल्हास कुताळ व अनिल वारे हे रस्त्याने जात असताना अचानक बिबट्या काही फुटांच्या अंतरावर आल्याने धाबे दणाणले. त्यामुळे आता बिबट्या आता श्रीरामपूर शहराजवळ आल्याने अनेकांनी धसका घेतला आहे.

शहरालगत गायकवाड वस्ती पासून काही अंतरावर विद्यानिकेतन शाळेतून शनिवारी नेहमीप्रमाणे पाटणी हे आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी दुपारी गेले. मुलाला घेऊन ते परतत असताना शाळेपासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरच त्यांना बिबट्याचा बछडा आडवा गेल्याने ते घाबरले. मात्र काही वेळातच हा बछडा रस्त्यावरुन लगतच्या पपईच्या शेतामध्ये गेला.

बिबट्याचा बछडा निदर्शनास पडल्याने या भागात मादी बिबट्याचेही वास्तव्य असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या भागातून दररोज अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत ने-आण करत असतात. तर काही विद्यार्थी सायकलवरुन ये-जा करत असतात. त्यामुळे पालकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर दोन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास ऐनतपूर येथील कुताळ वस्तीवरही उल्हास कुताळ व अनिल वारे हे रस्त्याने जात असताना अचानक बिबट्या काही फुटांच्या अंतरावर आल्याने त्यांचे धाबे दणाणले.

त्यांनी आरडा-ओरडा केल्यानंतर वस्तीवरील लोक पळत आले. फटाके वाजवल्यानंतर बिबट्या पळून गेला. दोन- तीन दिवसांपूर्वी पूर्णवादनगर जवळील महाले पोद्दार या इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळील एका वस्तीवरील एक पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली आहे.

त्यामुळे वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान याबाबत नागरिकांनी जि. प. सदस्य शरद नवले यांचेशी संपर्क साधून माहिती दिली. त्यावर त्यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून माहिती देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली मात्र अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

यावर शरद नवले यांनी कडीत-कुरणपूर, गळनिंबला माणसांवर हल्ले करून माणसे मारल्यावर पिंजरा लावणार का? असा प्रश्न केला यावर आम्ही माणसं मारले नाही तर बिबट्याने मारले त्यात आमचा दोष काय? असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे शरद नवले यांनी सांगितले. त्यामुळे सदर वनाधिकारीबाबत संताप व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com