बिबट्याचे नाव अन् अधिकार्‍यांचा मटनावर दररोज ताव

बिबट्याचे नाव अन् अधिकार्‍यांचा मटनावर दररोज ताव

नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आलेली यंत्रणा ओल्या पार्ट्यांतच मश्गूल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – आठ-दहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील कुरणपूर शिवारात चुलतीच्या हातातून ओढत नेऊन लहान मुलाचा बिबट्याने फडशा पाडला.ही घटना ताजी असतानाच त्याच शिवारातील गळनिंब परिसरातील मारकड कुटुंबीयांच्या तीन वर्षाच्या मुलीला आजीच्या हातातून ओढून नेत नरभक्षक बिबट्याने तिचा जीव घेतला. पिंपळगाव फुणगी शिवारातील एक मुलगा आईच्या सतर्कतेमुळे बिबट्याच्या तावडीतून बालंबाल बचावला. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे उक्कलगाव,गळनिंब,फत्त्याबाद पंचक्रोशिमध्ये भीतीचे सावट निर्माण होऊन ग्रामस्थ आक्रमक झाले.

वनविभागाच्या सुस्त कारभाराविरोधात त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. वाढता जनक्षोभ विचारात घेऊन आ.लहु कानडे यांनी हस्तक्षेप करत वनखात्यासह सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरल्याने यंत्रणा खडबडून जागी होत ठिकठिकाणी हायमॅक्स व पिंजरे बसविण्यात येऊन नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी विस-पंचविस अधिकार्‍यांचा ताफा ड्रोन कॅमेरासह उक्कलगाव-गळनिंब शिवारात रात्रंदिवस तळ ठोकून असल्याने काहीप्रमाणात दिलासा मिळाला असला तरी बिबट्या पकडण्याचे गांभीर्य सोडून वनविभागाचे कर्मचारी व अधिकार्‍यांनी मुक्कामाच्या ठिकाणी राजरोसपणे दारू व मटनाच्या ओल्या पार्ट्या सुरू केल्याने ग्रामस्थ पुन्हा भीतीच्या सावटाखाली गेले आहेत.

गहू, हरभरा, कांदा या पिकांना सध्या पाण्याची गरज असून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दिवस-रात्र करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. वनखात्याचे अधिकारी तळ ठोकून असल्यामुळे बिबट्या पकडला जाईल,या भाबड्या आशेवर बसलेल्या शेतकरी आणि ग्रामस्थांची मात्र निराशा होत असून, या अधिकार्‍यांनी उक्कलगावातील एका बड्या शेतकर्‍याच्या शेडमध्ये दारू व मटन पार्ट्यांचा हैदोस घालून दारूच्या रिकाम्या बाटल्या व हाडे यांचा ढीग साचवल्याने संबंधित शेतकर्‍याने त्यांना त्याठिकाणी राहण्यास मज्जाव केला.

त्यामुळे या अधिकार्‍यांनी आपला गाशा गुंडाळून फत्त्याबाद शिवाराकडे कूच केली. मात्र बिबट्याचा वावर गळनिंब शिवारात असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांचा रोष बघून हा ताफा परत माघारी आला.सद्य स्थितीला गळनिंब मधील एका शेडमध्ये त्यांनी तळ ठोकला आहे.

दरम्यान,स्थानिक तरुण वनविभागाच्या या अधिकार्‍यांना सर्वोतोपरी सहकार्य करून परिसरातील बिबट्याच्या वावराविषयी वेळोवेळी माहिती पुरवत आहेत. वास्तविक पहाता सायंकाळी सहा ते सकाळी सहा या कालावधीत बिबट्या बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते. या कालावधीत बिबट्याच्या शोधार्थ आलेल्या अधिकार्‍यांनी दक्ष राहणे गरजेचे असताना नेमके याचवेळी ते पार्ट्यांमध्ये मग्न होत असल्याने हे अधिकारी बिबट्या पकडायला आलेत की सफरीला? हे समजेनासे झाले आहे.

त्यांनी पार्ट्या करण्यास ग्रामस्थांची हरकतही नाही पण त्यांनी निदान वेळेचे महत्त्व पाळावे व लवकरात लवकर बिबट्या जेरबंद करून जनजीवन सुरळीत करावे,एवढीच अपेक्षा आहे. अधिकार्‍यांनी आपल्या शेड्यूलमध्ये बदल न केल्यास पंचक्रोशितील तरुण कोणत्याहीक्षणी पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचा इशारा तरुण वर्गासह शेतकर्‍यांनी दिला आहे.

परिसरात एका निरागस चिमुकलीचा जीव जाऊन जवळपास विस दिवस होत आले.आ.लहु कानडे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर यंत्रणा जागी झाली असली तरी बिबट्या मात्र अजूनही मोकाट आहे. केवळ फार्स म्हणून ही यंत्रणा कार्यरत असेल तर आणखी किती लोकांचे बळी बिबट्या घेणार? या प्रश्नाला सध्यातरी उत्तर नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com