Friday, April 26, 2024
Homeनगर‘लर्निंग फ्रॉम होम’ उपक्रमास शाळांचा वाढता प्रतिसाद

‘लर्निंग फ्रॉम होम’ उपक्रमास शाळांचा वाढता प्रतिसाद

निबंधातील एका ओळीमुळे कुटूंबाला मिळाली मदत

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- निबंधातील एका ओळीमुळे सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत विद्यार्थिनीच्या कुटूंबाला मदत मिळाली. यासाठी शाळेच्या शिक्षकांचेही योगदान महत्वपूर्ण ठरले. कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे. शाळांना सुट्टी आहे. माणसं घरात बसून आहेत. मुलांना गृहपाठ देण्यासाठी येथील परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल शाळा क्रमांक पाचचे शिक्षक गेली तीन वर्ष मोबाईलवर एसएमएसद्वारे गृहपाठ देत आहेत. शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी सर्व शिक्षकांना पालकांशी संपर्क ठेवण्याचे आवाहन केले.

घरी मुले करीत असलेला गृहपाठ व्हॉट्सअपवर मागवून मुलांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी सर्व वर्गशिक्षकांना दिल्या. त्यानुसार इयत्ता चौथीतील एका मुलीने कोरोना व्हायरस या विषयावर लिहिलेला निबंध वर्ग शिक्षिकेच्या मोबाईल वर पाठवला. चांगला निबंध म्हणून तो शाळेच्या ग्रुपवर पाठवण्यात आला. उत्सुकतेपोटी त्या निबंधाचे वाचन करताना मुख्याध्यापक पठाण यांच्या असं लक्षात आलं कि मुलीने उर्दूमध्ये लिहिलंय, कोरोना व्हायरस की वजेसे सबको बहुत तकलीफ हो रही है. कामधंदे बंद हो चुके है. हम सब लोग घर मे बैठे है. खाने का सामान लाने के लिए पैसे नही है. कोई भी सहेली कोरोना व्हायरस की वजेसे मुहल्ले मे नही आ रही है.
या निबंधातील खाने का सामान लाने के लिए पैसे नही है हे वाक्य त्यांच्या हृद्याला भिडले.

- Advertisement -

त्यांनी वर्गशिक्षिका निलोफर शेख यांना फोन करून सदर मुलीच्या पालकांशी संपर्क करून त्यांची परिस्थिती जाणून घेण्यास सांगितले. वर्ग शिक्षिकेने पालकांशी संपर्क साधला. त्या मुलीच्या आईने सांगितले की माझे पती दररोज गाडी वर भांडी विकायला जातात. परंतु आठ दिवसापासून हा धंदा बंद आहे आणि खरोखर घरामध्ये सामान आणायला पैसे नाहीत. त्यामुळे सध्या उपासमार सुरू आहे. वर्ग शिक्षिकेने त्या पालकाची ही करून कहाणी मुख्याध्यापकांना सांगितली. त्यांनी आपल्या एका किराणा दुकानदार मित्राशी संपर्क करून आवश्यक साहित्याची मदत या पालकाला केली तसेच सर्व वर्ग शिक्षकांना सूचना देऊन आपापल्या वर्गातील मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांची परिस्थिती जाणून घेऊन गरजूंना मदतीचे आवाहन केले.

समाजात जे खरोखरच गरीब आहेत त्यांना समाजातील व्यक्ती, संस्था यांच्या रूपाने मदत मिळत आहे. परंतु खर्‍या अर्थाने जे लोक रोज दोन तीनशे रुपये कमावून हातावर आपल्या कुटूंबाचे पोट भरतात अशा मध्यमवर्गीय लोकांचे सध्या खूप हाल सुरू आहेत. अशा लोकांना सुद्धा मदत करण्याची गरज आहे.
– सलीमखान पठाण, मुख्याध्यापक न. पा. शाळा क्रमांक 5

जि. प. खैरी शाळेचे विद्यार्थी गिरवताहेत घरीच अभ्यासाचे धडे !

खैरी निमगाव (वार्ताहर) – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळांना सुट्टी दिली. मात्र या सुट्टीच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमाशी जोडलेली नाळ कायम रहावी म्हणून जिल्हा परिषदेच्या खैरी शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लर्निंग फ्रॉम होम या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे.

संचारबंदीमुळे विद्यार्थी व शिक्षक यांचा प्रत्यक्ष संवाद पूर्णपणे थांबला आहे. विद्यार्थ्यांना घरीच राहून अभ्यास करता यावा यासाठी खैरी शाळेचे मुख्याध्यापक वाघुजी पटारे यांनी ‘लर्निंग फ्रॉम होम’ ही अभिनव संकल्पना राबवली आहे. इयत्ता 1ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या व्हाट्सअ‍ॅप क्रमांकावर दररोज शालेय अभ्यासक्रमावर आधारीत वेगवेगळे प्रश्न दिले जातात.

प्रश्नांमध्ये मराठी व इग्रंजी विषयाच्या वाचन सरावासाठी मुळाक्षरे, जोडाक्षरे, विविध उतारे आणि त्यातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियांच्या सरावासाठी विविध उदाहरणे दिली जातात. ऑनलाईन सराव परीक्षा घेतली जाते. विद्यार्थी पालकांच्या व शिक्षकांच्या मदतीने गृहपाठ तपासून चुकांची दुरूस्ती करतात.

गटशिक्षणाधिकारी सुनिल सूर्यवंशी, केंद्रप्रमुख सौ.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक पटारे, शिक्षिका विद्या बैरागी, मिरा जोशी, गोपीनाथ देसाई हे उपक्रम राबवत असतात. या अभिनव उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पोकळे, सरपंच शिवाजी शेजुळ, उपसरपंच आदिनाथ भाकरे, शाळा व्यवस्थापन समीती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पालक वर्गातुन कौतुक होत आहे.

शिक्षण विभागाने हा उपक्रम राबवण्यास सांगितले आहे. खैरी शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी तालुक्यातील अग्रेसर शाळा आहे. मुख्याध्यापक पटारे यांच्या पुढाकाराने तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला जात आहे. त्यास पालक आणि विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत.

– सुनिल सूर्यवंशी, गट शिक्षणाधिकारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या