Friday, April 26, 2024
Homeनगरलॉकडाऊनमध्ये एलसीबीचे विविध ठिकाणी छापे; साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त

लॉकडाऊनमध्ये एलसीबीचे विविध ठिकाणी छापे; साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त

276 जणांवर गुन्हे दाखलः अवैध धंद्यांसाठी करोना ठरली इष्टापत्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहमीच अवैध धंद्याच्या बाबतीतील आघाडी लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याने कायम ठेवली आहे. अवैध दारू विक्री, जुगार, अवैध वाळू उपसा व वाहतूक, सुगंधी तंबाखू व त्यापासून तयार करून विक्री होणारा मावा हे सर्व धंदे जिल्ह्यात लॉकडाऊन काळातही तेजीत आहेत. काही लोकांसाठी करोना महामारी इष्टापत्ती ठरली आहे. अवैध धंदे करणार्‍या लोकांचे पितळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडे केले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 276 ठिकाणी छापे टाकून तीन कोटी 47 लाख 48 हजार 647 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 398 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील गुन्हेगारी फोफावण्याचे कारण अवैध धंदे आहेत. जिल्हा अवैध धंद्याच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असतो. अवैध वाळू तस्करी करणारे तर पोलीस, महसूल अधिकारी यांच्यावर हल्ले करण्यात मागेपुढे पाहत नाही. करोना संसर्गामुळे सर्व उद्योग धंदे, आस्थापने बंद केली होती. अद्यापही पुर्णतः सुरू झालेले नाहीत. मात्र काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात पूर्णतः बंद होते.

दारू बंदी करण्यात आली होती. यामुळे तळीरामांची पंचायत झाली. या काळात हातभट्टी, विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. घरामध्ये दारू तयार करणार्‍या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून दारू निर्मिती कारखाने उद्ध्वस्त केले. गुन्हे शाखेने 189 ठिकाणी दारू अड्ड्यावर छापे टाकून 79 लाख आठ हजार 561 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 174 व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जुगार खेळण्याचे प्रमाण जोरात सुरू आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. पारावर, शेतामध्ये मोठ मोठे डाव सुरू असतात. यामधून करोना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. संगमनेर तालुक्यात तसा प्रकार घडला आहे. नगर शहरात तर जुगाराच्या वादातून खून झाल्याची घटना मागील महिन्यात घडली. गुन्हे शाखेने 39 ठिकाणी छापे टाकून रोख रक्कम, जुगार साहित्य असा 19 लाख 19 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 171 जुगारी विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. महसूल अधिकारी, कर्मचारी व पोलीस खाते करोनामुळे व्यस्त असल्याचा फायदा अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्‍यांना झाला.

अवैध वाळू उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करणार्‍या 29 ठिकाणी छापे टाकून 29 लाख 77 हजार 156 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 26 व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर निर्बंध घातले. गुटखा विक्री करणार्‍यांवर अन्न प्रशासनाचे अधिकारी कारवाई करत नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूपासून तयार होणारा मावा, गुटखा विक्री केली जात आहे.

लॉकडाऊनमध्ये हा धंदा तेजीत असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी 19 ठिकाणी छापे टाकून तब्बल दोन कोटी 19 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 27 गुटखा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्या असल्या तरी अजूनही अवैध धंदे जोरात सुरू आहेत. करोना प्रादुर्भाव होण्यासाठी हे धंदे एक माध्यम आहे. यावर पोलिसांनी अजून कडक मोहीम राबवून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या