Friday, April 26, 2024
Homeनगरजमीन लाटण्यासाठी बेलवंडीत मृत विश्वस्त केले जिवंत

जमीन लाटण्यासाठी बेलवंडीत मृत विश्वस्त केले जिवंत

अंजनाबाई ट्रस्टच्या जमिनीची विक्री : 24 जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेलवंडी येथील अंजनाबाई ढमढेरे ट्रस्टचे विश्वस्त मृत असताना त्यांच्या नावे बोगस व्यक्ती उभी करून ट्रस्टची जमीन विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत ट्रस्टचे सचिव चंद्रकांत ढमढेरे यांनी श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद दिली असून, चोवीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अंजनाबाई भिकाजीराव ढमढेरे ट्रस्टचे विश्वस्त मयत असताना या जागी बनावट लोक उभे करून मयत ट्रस्टी जीवंत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रस्टची श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक येथील तीन एकर नऊ गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार समोर आला. ट्रस्टचे सचिव चंद्रकांत काशीनाथ ढमढेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन नायब तहसीलदार, तत्कालीन सबरजिस्ट्रार यांच्यासह साक्षीदार, तत्कालीन तलाठी, मंडलाधिकारी अशा एकूण 24 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनमधे दाखल करण्यात आला आहे.

हा फसवणुकीचा प्रकार 30 नोव्हेंबर 2015 ते 17 जून 2016 या दरम्यान घडला. फसवणूक प्रकरणी गौतमचंद पुनमचंद बांठिया (रा. माणिकनगर, स्टेशनरोड अ. नगर), सुभाष अर्जुन पवार (रा. बेलवंडी शुगर, तत्कालीन नायब तहसीलदार), महेश खेतमाळी, विजय मोरे (रा. श्रीगोंदा), रामदास थोरात (रा. लोणीव्यंकनाथ), राजू कोरे (रा मढेवडगाव), चंद्रकांत सिनलकर (रा. श्रीगोंदा), अन्सार शेख, अभिजित रेपाळे (रा. श्रीगोंदा), खरेदी करणार अजित काकडे (रा. लोणीव्यंकनाथ), रामदास शेलार (रा. बेलवंडी), सतीश लगड (रा. कोळगाव), किशोर पवार (रा. बेलवंडी स्टेशन), नाना सय्यद (रा, रेल्वे स्टेशन, श्रीगोंदा), मोहन डांगे (रा. श्रीगोंदा कारखाना), सचिन भडांगे (मॅनेजर श्रीगोंदा-आयडीबीआय बँक), बी. डी. पानसरे (कामगार तलाठी, बेलवंडी), हमशोद्दीन शेख (मंडलाधिकारी बेलवंडी), पांडुरंग निंभोरे (रा. घोटवी), विलास म्हस्के, राजेंद्र क्षीरसागर (रा श्रीगोंदा), अजित ओसवाल (आयडीबीआय बँक, श्रीगोंदा) आदी चोवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढमढेरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की या सर्व लोकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ट्रस्टी मयत आहेत हे माहिती असून सुद्धा मयत ट्रस्टीच्या जागी खोटे लोक उभे केले. बनावट बेकायदेशीर दस्तावेज तयार करून बनावट ओळखपत्र, बोगस सह्या व अंगठ्यांच्या आधारे ट्रस्टची गट नं 728 मधील जमीन बळकावून फिर्यादी व ट्रस्टची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना अटक करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचे कारनामे
मांडवगण, ढोरजा, कोथुळ, चिखली, मढेवडगाव, सुरेगाव अशा अनेक गावांत बोगस माणसे उभी करून बनावट कागदपत्रे तयार करत जमीन घोटाळा करणारी टोळी आहे. दस्त बनवण्यासाठी दुय्ययम निबंधक कार्यालयात येतात. मात्र असे दस्त नोंदवण्यासाठी दलालांनी केलेल्या मध्यस्थीमुळे असे प्रकार डोळ्याआड केले जात असल्याने कारनामे वाढत आहेत. आता प्रथमच तत्कालीन दुय्ययम निबंधक आणि हा दस्त नोंदणी करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बनावट कागदपत्राच्या आधारे जमीन विक्रीची मालिका
श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांत अशा प्रकारे बोगस कागदपत्रे तयार करून बनावट माणसे उभी करून जमीन खरेदी विक्री होत आहे. मागील वर्षभरात तब्बल दहा ते बारा घटना उघड झाल्या. यातील सूत्रधार आरोपी अद्यापही मोकाट आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या