Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीगोंदा : कुकडीच्या पाण्याचे नियोजन होत नसल्याने शेतकरी आक्रमक

श्रीगोंदा : कुकडीच्या पाण्याचे नियोजन होत नसल्याने शेतकरी आक्रमक

शाखा अभियंत्याला धक्काबुक्की; श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कुकडी कालव्याचे पाणी श्रीगोंदा हद्दीत सुरू झाले असले तरी पाण्याचे नियोजन होत नाही. सुरू असलेले आवर्तनाचे पाणी परस्पर वळवू नका, आम्ही तुम्हाला देतो, असे म्हणणार्‍या शाखा अभियंताची वैतागलेल्या शेतकर्‍यांनी गचांडी धरीत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याने शेतकर्‍याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

जलसंपदा विभागाचे शाखाधिकारी भाऊसाहेब पंधरकर यांनी श्रीगोंदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत बाळू विष्णू मोटे (रा. पारगाव सुद्रिक) या शेतकर्‍यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. मात्र पाण्याची कमतरता असून श्रीगोंद्याच्या वाट्याचे पाणी लवकर बंद होणार, या चर्चेने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच आज आरोपी मोटे यांनी थेट अधिकारी पंधरकर यांना मारहाण केल्याचा आरोप झाला.

पारगाव शिवारातील कॅनॉल 132 वरील मायनर 13 चारीजवळ ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. पारगाव परिसरात फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. पाण्याची कमतरता जाणवत असताना श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांना कायमच पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने अनेक वेळा शेतकरी आणि कुकडीचे अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांच्यात संघर्षाच्या ठिणग्या उडतात.

शाखा अभियंताने केले कलेक्शन, पैसे दिले मात्र पाणी नाही
पाणी मिळावे यासाठी अनेक शेतकरी पाण्याचे डिमांड देत असतात. बेलवंडी परिसरात शेतकर्‍यांनी पाण्याचे डिमांड दिले. यासाठी कलेक्शन करून रक्कम दिली, मात्र ही रक्कम कार्यालयाकडे किती जमा झाली हा देखील चर्चेचा विषय आहे. याबाबत या ठिकाणच्या शेतकर्‍यांनी पाण्याचे पैसे दिले; मात्र पाणी मिळत नसल्याने आक्रमक झाले असल्याने हा प्रकार घडल्याचे एका शेतकर्‍यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या