कुकडीच्या पाण्यासाठी शेतकरी बचाव कृती समिती आक्रमकच
Featured

कुकडीच्या पाण्यासाठी शेतकरी बचाव कृती समिती आक्रमकच

Sarvmat Digital

नियोजन न कळविल्यास जलसमाधी आंदोलन’

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्यात आले असून पाणी टेल टू हेड असे दिले जाणार असल्याने श्रीगोंदा तालुक्याला कुकडीच्या पाण्याबाबत कायम अन्याय सहन करावा लागत असल्याने श्रीगोंदा तालुका शेतकरी बचाव कृती समितीने आक्रमक पावित्रा घेतला असून कालव्याच्या 139 किलो मीटरजवळ कालव्यात बसून आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. तत्पूर्वी या कृती समितीच्या सदस्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.

कुकडी कालव्याच्या सुटलेल्या आवर्तनापैकी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वाट्याला नक्की किती पाणी येणार आहे आणि ते पाणी कोणकोणत्या वितरिकेला कधी कधी सुटणार आहे, याची तारखेवार माहिती कुकडी अधिकार्‍यांकडून मिळावी, यासाठी रितसर कुकडी प्रशासनाला निवेदन दिले आहे, याची तारीखवार माहिती व नियोजन आम्हा शेतकर्‍यांना लेखी स्वरूपात मिळणे गरजेचे आहे, तसे न झाल्यास आम्ही शेतकरी यासाठी कुकडी कॅनॉलमध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहोत.

आमच्या हक्काच्या पाण्याची माहिती व अंमलबजावणी हा शेतकर्‍यांचा अधिकार असून प्रत्येक आवर्तनाला आमच्यावर होणारा अन्याय यापुढे आम्ही शेतकरी सहन करणार नाहीत. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला देण्यासंदर्भात कुकडी प्रशासनाने योग्य नियोजन करून रितसर टेल टू हेड आवर्तन करावे. आम्हाला जर आमच्या आवर्तनचे शेड्युल मिळले नाही तर आम्ही शेतकरी श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीतून पुढे पाणी जाऊ नये, यासाठी जलसमाधी आंदोलन करणार असल्याने या कृती समिती सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा
कुकडी कालव्याचे सुटलेले आवर्तन हे पिण्याच्या पाण्यासाठी असून या काळात पाण्यासाठी आंदोलन करू नये म्हणून या शेतकरी बचाव कृती समितीचे आंदोलनाच्या पुर्वीच प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत, असे असले तरी आंदोलनावर ठाम असल्याचे समितीचे प्रवर्तक राजू काकडे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com