Thursday, April 25, 2024
Homeनगरकोरठण खंडोबाचे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन

कोरठण खंडोबाचे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – सदानंदाचा येळकोट येळकोट, जय मल्हार चा जयघोष करीत भंडारा – खोबरे यांची उधळण करीत व आपल्या कुलदैवताचे कुलधर्म कुलाचार पार पाडण्यासाठी तसेच खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून पिंपळगाव रोठा ता. पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शनिवारी दिवसभरात सुमारे दोन लाखांवर भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले.

सकाळी सहा वाजता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते खंडोबाची महाआरती झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. सकाळी नऊ वाजता पिंपळगाव रोठा गावात मुक्कामी गेलेल्या खंडोबा उत्सव मूर्तीची पालखी मिरवणूक गावात सुरू झाली. दुपारी दीडच्या सुमारास पालखी मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत शाही रथातून कोरठणला आल्यानंतर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. यावेळी भाविक पालखीवर भंडारा खोबरे यांची उधळण करीत पालखीचे दर्शन घेत होते.

- Advertisement -

मंदिरासमोर पालखी आल्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी विश्वस्त मोहन घनदाट, किसन धुमाळ, दिलीप घोडके, अमर गुंजाळ, किसन मुंढे, हनुमंत सुपेकर, बन्सी ढोमे, रामदास मुळे, जालिंदर खोसे, धोंडिभाऊ जगताप, अच्युतराव जगदाळे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे उपस्थित होते. दरम्यान अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी यात्रा नियोजनाची पाहणी केली.

उपसभापती सुनंदा धुरपते, माजी सभापती सुदाम पवार, नाशिकच्या तहसीलदार सविता पठारे यांनी यात्रेला उपस्थिती लावली. यात्रेत पोलीस उपनिरीक्षक संदिपान वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आले आहे. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी परंपरेनुसार भाविक आपल्या बैलजोड्यांना देवदर्शनासाठी घेऊन येतात. यंदाही शेकडो बैलजोड्यांना शेतकरी भाविकांनी वाजत गाजत मंदिरासमोर आणून देवदर्शन घडविले.

पिंप्री पेंढार जि. पुणे येथील मानकरी एकनाथ शेलार यांनी आणलेल्या मानाच्या बैलांचे देवस्थानकडून स्वागत करण्यात येऊन शेलार यांचा सन्मान करण्यात आला. दुपारी 4 वाजात सावरगाव घुले येथील मानाच्या पालखीची मिरवणूक पार पडली. रात्री मंदिराजवळ खंडोबा पालखीची छबिना मिरवणूक पार पडली. कान्हूरपठार, बेल्हे, आळेफाटा (जि. पुणे) येथून कोरठणसाठी जादा एसटी बस सोडण्यात आल्या आहेत. आज रविवारी यात्रेचा मुख्य व शेवटचा दिवस असून यावेळी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होईल असा अंदाज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या