Thursday, April 25, 2024
Homeनगरकोपरगावात यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

कोपरगावात यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

मकावरील लष्करी आळीचा शेतकर्‍यांनी घेतला धसका ; इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचा खर्च कमी

कान्हेगाव (वार्ताहर)- तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन लागवडीतील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन व मका ही दोन्हीही पिके जास्त प्रमाणात शेतकर्‍यांनी घेतली होती. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. उत्पादनात घट होवून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले होते. तसेच कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता.

- Advertisement -

मक्याच्या कणसातच लष्करी अळी निर्माण झाल्यामुळे प्रभावी कीटकनाशकाची फवारणी करावी लागली होती. त्यामुळे मकाचा चारा जनावरांना खाण्यास वापरता आला नाही. मका पिकाची लागवड करावी की नाही अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी दिसत आहेत. अनेक शेतकर्‍यांनी तर थेट कणसात कीटकनाशकांची फवारणी केली होती. यासाठी थायमेंटचा वापर केला होता. दोन तीन वेळा फवारणी करूनही अळ्या कंट्रोल होत नव्हत्या. मागील वर्षाची परिस्थिती पाहता यावर्षी खरीप हंगामात मका या पिकाचे लागवड कमी प्रमाणात होऊ शकते. गेल्या वर्षी रब्बीच्या हंगामात मात्र लष्करी अळीवर नियंत्रण आणल्याने मकाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले होते.

मका व सोयाबीन ही दोन्हीही पिके नगदी असल्याने शेतकर्‍यांचा ही पिके घेण्याकडे जास्त कल असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र या वर्षी शेतकर्‍यांचा सोयाबीनकडे जास्त कल असल्याचे दिसून येत आहे. गेल्या हंगामात पिकवलेल्या मका पिकास लॉकडाऊन मुळे पशुखाद्याचे कारखाने बंद असल्याने व बाहेरगावी निर्यात बंद असल्याने मकाचे दर घसरलेले आहेत. सोयाबीनचीही निर्यात बंद असल्याने प्रतिक्विंटल चे भाव 4200 रुपयांवरून 3500 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत.

सोयाबीन पिकावर बुरशी वगळता इतर रोग येत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचा इतर खर्च वाचतो. ही परिस्थिती पाहता शेतकर्‍यांचा सोयाबीन पेरणीकडे जास्त ओढा दिसून येत आहे. कोपरगावात मागील चार वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण वाढल्याने शेतीसाठी पाणी टंचाई जाणवली नाही, त्यामुळे उसाच्या क्षेत्रातही वाढ झालेली आहे.

तालुक्यातील पूर्व भागात कापूस केला जातो परंतु गत वर्षी कापूस वेचण्या साठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी वैतागले होते.त्यामुळे कापूस लागवडीच्या क्षेत्रातही घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल अचानक आलेल्या जोरदार पावसाने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात चांगलीच धांदल उडाली. शहरातील भाजी मार्केट इतर सखल भागात खुपच पाणी साचले होते. तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतातुन पाणी वाहत होते. शेतकरी झालेल्या पावसाने सुखावला असून शेतीच्या मशागतीस वेग आला आहे, विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागात पेरणीलायक पाऊस झाला आहे.

खरीप 2019 हंगामातील पिकांचे क्षेत्र
बाजरी – 2993 हेक्टर
सोयाबीन – 18973 हेक्टर
कापूस – 3755 हेक्टर
मका – 18395
तूर/ मूग – 250 हेक्टर
फळपिके – 2402 हेक्टर

घरचेच बियाणे वापरावे
घरचे बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. शेजारच्या शेतकर्‍याचे बियाणे विकत घेऊन पेरणी करत असाल तरीही त्याची उगवण क्षमता तपासणी करून घ्यावी. एका पोत्यात 100 बिया विशिष्ट अंतरावर ठेवून ते गुंडाळून ठेवावे त्यावर पाणी घालून सुमारे पाच ते सहा दिवसांनी किती बियांना मोड फुटले ते पाहावे. 70 टक्के व त्यापेक्षा जास्त उगवन क्षमतेचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. बियाणाला पेरणीपूर्वी रायझोबियम व पीएसबी या नत्र व स्फुरद स्थिरीकरण करणार्‍या जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.
– अशोक आढाव, तालुका कृषि अधिकारी,कोपरगाव.

मागील वर्षी मका पिकावर लष्करी अळीचाप्रादुर्भाव झाल्याने दोन वेळेस कीटकनाशक फवारावे लागले. मकाच्या कणसातच अळी तयार झाल्याने थेट प्रत्येक कणसावर औषध फवारणी करणे फार अवघड होते.उत्पादनातंही घट झाली. यावर्षी मकाचे क्षेत्र कमी करणार आहे.
– संदीप भाकरे, शेतकरी, कान्हेगाव.

- Advertisment -

ताज्या बातम्या